पुणे – “पवित्र’ शिक्षक भरतीत न्यायालयीन अडथळा

– प्राधान्यक्रम नोंदविण्याची प्रक्रिया लांबणीवर

पुणे – राज्य शासनातर्फे पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. यामुळे शिक्षक भरतीचा टप्प्पा पुढे सरकण्यास अडथळा निर्माण झाला आहे. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

पोर्टलवर उमेदवारांची नोंदणी झाली असून सुमारे 12 हजार जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थाकडून जाहिरातीही प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. आता उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे. या सॉफ्टवेअरद्वारे उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार राज्यातील सर्व शाळांची यादी एकाच वेळी पाहता येणार आहे. सहजासहजी प्राधान्यक्रम नोंदविता येणार आहेत.

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्याच्या प्रक्रियेवर विविध मुद्दे उपस्थित करुन काही उमेदवारांनीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या आहेत. त्यामुळे न्यायालयात विविध प्रकरणे प्रलंबित पडली आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा एप्रिलमध्ये देण्यात येईल. याबाबतच्या स्पष्ट सूचना पोर्टलवरच देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच भरती प्रक्रिया मार्गी लागण्याची जास्त शक्‍यता असल्याचीही माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

उमेदवारांना पोर्टलवर प्रोफाइल अपडेट करण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे. प्रवर्ग बदल करणे, नॉन क्रिमिलेअरची माहिती अद्ययावत करणे,अर्ज स्वप्रमाणित करणे व अर्जाची प्रिंट काढणे अथवा अन्य काही बदल करावयाचे असल्यास उमेदवारांसाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.

अर्ज अद्ययावत करण्याची संधी
उमेदवारांनी लेखी अर्ज, मूळ ओळखपत्र, आवश्‍यक कागदपत्र यासह पवित्र मदत कक्षामध्ये स्वतः उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. संबंधित उमेदवारास फक्त एकदाच त्यांची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दिली जाणार आहे. येत्या 31 मार्च पर्यंत ही सुविधा उपलब्ध राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)