‘पवना’चा साठा सरासरीपासून दूरच

गतवर्षीपेक्षा 9 टक्‍क्‍यांनी कमीच : पाणी कपातीचे संकट कायम

पिंपरी – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरणातील पाणी साठा 26 टक्‍क्‍यांवर पोहचला आहे. यंदाचा पाऊस गतवर्षीच्या सरासरीजवळ पोहचला असला तरी धरणातील पाणीसाठा सुमारे नऊ टक्‍क्‍यांनी कमी आहे. त्यामुळे शहरवासियांवरील पाणी कपातीचे संकट कायम राहणार असल्याची चिन्हे आहेत.

मावळसह पिंपरी-चिंचवडकर उद्योगनगरीची भिस्त पवना धरणावर आहे. गतवर्षी ऑगस्टमध्येच धरण शंभर टक्के भरले. परंतु, पावसाने लवकरच परतीची वाट धरली. त्यामुळे अवेळीच नदीऐवजी धरणातून पाणी उचलण्याची वेळ आली. त्यामुळे महापालिकेला दिवाळीपासूनच अंशतः पाणी कपात करावी लागली. यंदा तीव्र स्वरुपाच्या उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले. त्याचाही परिणाम पाणी साठ्यावर झाला. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.

जून महिना सुरू झाल्यानंतर जोरदार पाऊस सुरू होऊन पाणी कपातीपासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शहरवासियांना होती. परंतु, पावसाने चांगलीच ओढ दिली. उलट उन्हाचा पारा दिवसें-दिवस चढता राहिला. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यामध्ये कमालीची घट झाली. धरणात अवघा तेरा टक्केच पाणी साठा उरला. जून महिना सरत आला तरी पाऊस सुरू न झाल्याने शहरवासियांची चिंता वाढली होती. मात्र, जूनच्या शेवटच्या आठवड्‌यात मॉन्सूनचे आगमन झाले. धरणक्षेत्रातील पावसाची वाटचाल हलकी व मध्यम स्वरुपाची आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने पाणी साठ्यात वाढ होवू लागली आहे.

धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत 66 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत धरणक्षेत्रात 800 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाचा पाणासाठा 26 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. गतवर्षी आजअखेर धरणात 35 टक्‍के साठा होता. गतवर्षीची तुलना करता सरासरी गाठण्यासाठी धरणातील पाणीसाठा तब्बल दहा टक्‍क्‍यांनी कमी आहे. सध्या धरणात 2.23 टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्यातरी शहरवासियांची पाणी कपातीपासून सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पिंपरी-चिंचवडकरांचा पाणीसाठा पुर्ववत करण्यासाठी धरण किमान 80 टक्‍क्‍यांपर्यंत भरणे गरजेचे असल्याची माहिती पवना धरणाचे शाखा अभियंता ए. एम. गदवाल यांनी दिली.

पवना धरण 80 टक्‍क्‍यांपर्यंत भरल्यास आढावा बैठक घेऊन पाणी कपात मागे घेण्याबाबत निर्णय होऊ शकतो. मात्र यंदा पाऊस उशिरा सुरू झाला असून, धरणातील पाणी साठा अद्याप गेल्या वर्षीपेक्षा सरासरी 10 टक्के कमी आहे. धरण जुलैपर्यंत 80 टक्के भरले तर ऑगस्ट, सप्टेंबर आणि परतीचा पाऊस यातून 100 टक्के भरले जाते. मात्र, यंदा तशी परिस्थिती अद्याप नाही त्यामुळे पाणी कपात मागे घेण्याबाबतचा निर्णय सर्वस्वी पाऊस आणि धरणसाठा याचा ताळमेळ यावर अवलंबून आहे. धरणातील पाणीसाठ्यावर शहराच्या वर्षभराच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

– मकरंद निकम, सहशहर अभियंता, पिंपरी चिंचवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)