पाऊले चालती पंढरीची वाट…

सकाळी फिरून येताना भाजी घेऊन यायची पद्धत मी ठेवली होती. नेहमीची एक भाजीवालीही ठरलेली. त्या दिवशी तिच्याकडे अगदी बेताची भाजी होती. मी तिला म्हटले, “काय हो आज जास्त भाजी का नाही? तर ती म्हणाली, आज ही सारी संपवूनच जाणार आहे. उद्यापासून मी वारीला जाणार आहे. मग तीन-एक आठवडे तरी मी नाही. म्हणून पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय मला. हे माझं सातवं वर्ष आहे. मालकबी यायचेत! एकदा वारीला जाऊन आले की वर्षभर काही चिंता राहात नाही. तो विटेवर उभा आहे ना, तो सर्व काळजी घेतो.’

मी अवाक होऊन बघत राहिले किती साधं अध्यात्म होतं तिचं आणि त्या भक्तिभावात ती दंग होती. मी विचार केला की, भाजी विकून कितीे मिळकत असेल ही? पण त्यातसुद्धा वारी करण्याची तिची तयारी आणि तिच्यासोबत येणारा तिचा नवरा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्या दिवशी माझ्या डोक्‍यात सतत तिचाच विचार होता आणि मग मी वारीबद्दल येणारे सारे लेख माहिती अगदी बारकाईने वाचले वारीची परंपरा त्याचं अध्यात्मिक महत्त्व, वारीतील दिंड्या, त्यांचा सर्व प्रवासाचा मार्ग या सगळ्यापेक्षा यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची भक्ती मला जास्त महत्त्वाची वाटली. केवळ आणि केवळ फक्त “भक्तिभाव’ हाच वारीचा मोठा वारसा आहे.

यात सहभागी होणारे जास्त प्रमाणात कनिष्ठ वर्गातील दिसतात. तसंच फारसं शिकले-सवरलेले कमी असतील. परंतु एवढी लाखो माणसे एकच ध्यास घेऊन काही दिवस एकत्र चालत जाणे आणि वर्षानुवर्षे त्याचं पालन करणे, हे खरोखर आश्‍चर्यकारक आहे. वारीमध्ये सहभागी लोकांची संख्या बघता प्राथमिक सोयी-सुविधा तरी सर्वांना मिळत असतील असे वाटत नाही. जे मिळेल ते, जिथे मुक्काम असेल तिथल्या पद्धतीप्रमाणे मिळणारे जेवण, राहण्याची व्यवस्था जशी असेल तशी या सर्व अडचणींवर हे लोक कशी मात करत असतील? याशिवाय रोजचे दैनंदिन कार्यक्रमासाठीची गैरसोय, पिण्याच्या पाण्याची अपुरी सोय, अपुरी स्वच्छता या गोष्टी अगदी कमी महत्त्वाच्या मानीत ही सारी मंडळी आसमंतात जी सकारात्मकतेचे, भावभक्तीचे वातावरण पसरवतात. त्यामुळेच ही परंपरा अखंड राहिली आहे. वारीचे हेच महत्त्व आहे.

इथे सर्व एकाच पातळीवर आहेत. “भक्त’ म्हणून इथे कुणी मोठा नाही, कुणी छोटा नाही, श्रीमंत गरीब, सुशिक्षित, अशिक्षित, हा भेदाभेद नाही. असंख्य स्त्री-पुरुष अनेक दिवस एकत्र राहून देखील कधी अनुचित काही घडत नाही. कारण सर्वच एकाच भावनेने भारलेले आहेत. प्रत्येकजण दुसऱ्यामध्ये “माऊली’ पाहतो आणि तशीच हाक देतो म्हणून अमंगल काही घडत नाही.

घरापासूनच एसी कारमध्ये बसून, बिसलेरीचे पाणी पित, उत्तम हॉटेलमध्ये जेवण खाण्याच्या, नाष्त्याच्या सोयी असलेल्या अनेक सहली आपण करतो आणि घरी येऊन “दमले बाई…’ म्हणत सोफ्यावर आडवे होतो.

कुठून मिळत असेल ही अखंड ऊर्जा या वारकऱ्यांना? या प्रश्‍नांनी आणि त्या भाजीवालीच्या सतत वारी करण्याच्या निश्‍चयाने मी मात्र अचंबित झाले आणि कधी तरी पंढरपूरला जाऊन त्या विठूमाऊलीचे दर्शन घ्यावे असे मनात आले.
परमेश्‍वर फक्त भावाचा भुकेला आहे त्याचा वारा या वारीत अखंड वाहतो आणि म्हणूनच ही पावले पंढरीची वाट धरतात. नामघोषाने, भजनाने गजर करीत बेभान होऊन नाचत यात चालत राहतात. म्हणूनच बोला-

ज्ञानेश्‍वर माऊली
तुकाराम माऊली

– आरती मोने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)