असे घडले पुणे : पाताळेश्‍वर

पुण्याच्या ऐतिहासिक वारशामध्ये भर घालणारे आणखी एक ठिकाण म्हणजे पाताळेश्‍वर. शिवाजीनगर परिसरात हे लेणे जमीन खोदून बांधण्यात आले आहे. पुरातत्त्व खात्याने या ठिकाणी बाग उभारली होती. भारत सरकारने “राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केलेले हे ठिकाण पुणे शहराच्या अभिमानामध्ये भर घालते. पेशवेकाळात देखील या मंदिराची नोंद आढळते. हे मंदिर सुमारे 8 व्या शतकाच्या लेण्याच्या स्वरुपात तयार करण्यात आल्याचे उल्लेख आढळतात. मात्र, काही भागातील बांधकाम अपूर्ण असल्याचे दिसते.

रस्त्याला लागून असणाऱ्या काही पायऱ्या उतरल्यानंतर पाताळेश्‍वर परिसर दिसतो. लेण्याच्या बाहेरील भिंतीवर शिलालेख आहे, मात्र तो जीर्ण झाल्याने मजकूर स्पष्ट दिसत नाही. अन्य मंदिराप्रमाणे पाताळेश्‍वर येथे कळस नाही. वर्तुळाकार शैलीचे मोठे, जाड आणि कातळाचे छत हे येथील वैशिष्ट्यं आहे. गोलाकार आणि चौकोनी असे सुमारे 16 दगडी स्तंभांनी हा कातळ पेललेला आहे.

पातळेश्‍वराच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदीमंडप आहे. महादेवाचे वाहन असलेल्या नंदीच्या गळ्यामध्ये रेखीव माळा आणि घंटा कोरण्यात आली आहे. नंदी मंडपापासून पुढे एक ओसरी कोरल्याचे दिसते. आत प्रवेश केल्यानंतर चौकोनी स्तंभाच्या रांगा आहेत. पाताळेश्‍वर परिसरामध्ये तीन गर्भगृहे आहेत. त्यापैकी एका ठिकाणी शंकराची पिंड आहे. या गर्भगृहाशेजारी आणखी दोन मंदिरे आहेत. त्याच्या दरवाज्यावर कोरलेली नक्षी स्थापत्यशैलीची साक्ष देतात. याचबरोबर सभामंडपाच्या भिंतीमध्ये देखील चित्रे कोरल्याचे दिसते. महाशिवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा आणि दिवाळीत येथे भव्य दीपोत्सव साजरा करण्यात येतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)