धुम्रपानामुळे हृदयविकाराचा धोका (भाग २) 

डॉ. ब्रिजेशकुमार कंवर  

सिगरेट जळताना कार्बन मोनोक्‍साईड निर्माण होतो आणि तो आपल्या रक्तातील तांबडया पेशींमध्ये ऑक्‍सिजनपेक्षा कितीतरी जास्त वेगाने शोषला जातो. शरीरात ऑक्‍सिजनचे वाहन करण्यासाठी असलेल्या रक्तपेशींमध्ये कार्बन मोनोक्‍साईड चिकटून बसतो आणि त्यामुळे हृदयाला कार्य करताना निष्कारण त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त श्रम पडतात. 

धुम्रपानामुळे हृदयविकाराचा धोका (भाग 1)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्याने धूम्रपान केलेला धूर आपल्या श्वसनात जाऊ नये, यासाठी घ्यावयाची दक्षता :
आपल्या घरात कोणी धूम्रपान करत असेल, तर त्यांना बाहेर जाऊन धूम्रपान करायला सांगा.
कार, छोटया खोल्या अशा बंदिस्त ठिकाणी जर कोणी धूम्रपान करत असेल, तर त्या साचून राहिलेल्या धुराचा खूप जास्त त्रास होतो, तेव्हा अशा जागा आवर्जून टाळा.

जर तुम्हाला पूर्वी हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला असेल किंवा हृदयविकाराचे निदान झालेले असेल, तर दुसऱ्याने धूम्रपान केलेला धूर आपल्या श्वसनात जाऊ नये यासाठी अतिशय काटेकोर काळजी घ्यायलाच हवी.
धूम्रपानामुळे फक्त कर्करोग आणि हृदयविकाराचे आजार होतात असे नाही, तर शरीराचे वेळापत्रक बिघडते आणि निद्रानाश संभवतो, असे नव्या संशोधनातून समोर आले आहे.
धूम्रपानामुळे मेंदू आणि फुप्फुस यांच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. त्याचा परिणाम झोपेवर होऊन निद्रानाश होतो. यामध्ये आकलनासंबंधित बिघडलेले कार्य, मनाचा कल, तणाव आणि चिंता असे आजार दिसून येतात. धूम्रपानाचा परिणाम फुप्फुस आणि न्यूरोसायकोलॉजिक कार्यावरही होत असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.

धूम्रपानाचा परिणाम माणसाच्या गुणसूत्रांसह फुप्फुस व मेंदूवर होत असल्याचे दिसले. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातील एसआयआरटीयूआयएन-1 हे अणू कमी होत असतात. त्याचा परिणाम फुप्फुस व मेंदूतील क्‍लॉक प्रोटिनवर होत असतो. शास्त्रज्ञांनी याबाबतचे संशोधन काही उंदरांवर केले. यामध्ये काही उंदरांना थोड्या काळासाठी धुराच्या खोलीमध्ये ठेवले, तर काहींना बराच काळ या खोलीमध्ये ठेवले. या उंदरांना रोज अशा प्रकारे या धुराच्या खोलीमध्ये ठेवण्यात येत होते. तसेच रोज त्यांचे निरीक्षण करण्यात आले.

यामध्ये बराच काळ धुराच्या खोलीत ठेवण्यात आलेल्या उंदरांच्या हालचाली मंदावल्याचे दिसून आले. तसेच उंदरांच्या शरीरात असलेल्या एसआयआरटीयूआयएन-1 ची व उंदरांच्या शरीरातील क्‍लॉक प्रोटिनचीही हानी झाल्याचे दिसून आले. हे संशोधन द फासेब जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
भारतात गेल्या शंभर वर्षात धूम्रपानाने 10 कोटी लोकांचा बळी गेला असल्याचे अलीकडेच झालेल्या संशोधनात आढळले. गेल्या 100 वर्षात भारतात जवळजवळ 45 ट्रिलीयन विडी आणि सिगारेट्‌सचे उत्पादन केले गेले. या विडी आणि सिगारेट्‌सने या लोकांचा बळी गेला असल्याचे करंट सायन्स’ या विज्ञानविषयक पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटले आहे.

तंबाखूजन्य पदार्थामुळे 10 कोटी लोकांचा बळी गेला असून त्यापैकी विडी प्यायल्यामुळे मरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असावी, असा अंदाज या विषयावर काम करणाऱ्या संशोधकांनी व्यक्त केला आहे.
भारतात एवढया मोठ्या प्रमाणात तंबाखूमुळे लोकांचे मृत्यू होत असल्याबद्दल या संशोधकांनी चिंता व्यक्त केली असून तंबाखूचा वाढता प्रसार तातडीने रोखण्यासाठी सरकारने नियंत्रणे आणावीत तसेच तंबाखू उद्योगाबाबतच्या धोरणाचा फेरआढावा घेतला जावा, अशी मागणी केली आहे. संशोधकांनी तंबाखूसंबंधात विविध प्रकारच्या 23 माहिती स्त्रोतांची समीक्षा करून हा निष्कर्ष काढला. यात औद्योगिक अहवाल, व्यापार आणि शैक्षणिक नियतकालिके, इंटरनेटवरील माहिती, संदर्भग्रंथ आणि व्यापारपेठांचे संशोधन करणाऱ्या कंपन्यांकडून माहिती घेण्यात आली. या माहितीच्या आधारे 1920 ते 2010 पर्यंत बाजारात किती सिगारेट्‌स आल्या, याची माहिती संशोधकांना मिळाली. त्याचबरोबर याच कालावधीतील विडीच्या उत्पादनाचे प्रमाण जाणून घेण्यासाठी केंद्रीय कृषी खात्याकडून माहिती घेण्यात आली. त्या माहितीची तुलना इतर ठिकाणांहून मिळालेल्या 14 माहितीच्या स्त्रोतांबरोबर करून संशोधकांनी हा निष्कर्ष काढला. तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करायला लागल्यापासून तीन ते चार दशकांनंतर त्या व्यक्तीचा मृत्यू होत असे. मात्र, देशात तंबाखूजन्य पदार्थाचे उत्पादन आणि सेवन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे नव्याने धूम्रपान किंवा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करायला सुरुवात केलेल्या व्यक्तीचा मृत्यू हा त्या तुलनेत लवकर ओढवण्याची शक्‍यता आहे, असे या संशोधकांचे म्हणणे आहे.

भारतात 1910 ते 2010 या कालावधीत अंदाजे 200 कोटी लोक विडी तर चार कोटी 10 लाख लोक सिगारेट्‌स जीवनभर ओढत होते, अशी शक्‍यता गृहित धरून संशोधकांनी हा अंदाज वर्तवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)