उन्हाळी सुट्टी, ऐन लग्नसराईत नाहक मनस्ताप
सलग दुसरी घटना
पुणे-मुंबई मार्गावर धावणारी सिंहगड एक्सप्रेस दि.12 रोजी अचानक रद्द करण्यात आल्याचे प्रवाशांना स्थानकावर गेल्यावर समजल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. ब्लॉकचे कारण देत गाडी रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
पुणे – मध्य रेल्वेने नियोजित वेळापत्रकानुसार धावणाऱ्या काही गाड्या अचानक रद्द केल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. पुणे ते दौंड स्थानकांदरम्यान दुपारच्या सत्रात धावणाऱ्या पॅसेंजर पूर्वसूचना न देता रद्द करण्यात आल्याने रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. दुपारी दौंड स्थानकावरुन 12:10 वाजता सुटणारी बारामती-दौंड-पुणे पॅसेंजर दौंड ते पुणे स्थानकांदरम्यान रद्द करण्यात आली. याचा सर्वात जास्त फटका पाटस, कडेठाण, केडगाव आदी ठिकाणांवरील प्रवाशांना बसला. यामुळे नोकरदार, व्यावसायिक यांना मनस्ताप सहन करावा लागला. उन्हाळी सुट्टी आणि लग्न सराईमुळे रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे.
नोव्हेंबर 2017 पासून पुणे विभागामध्ये दर महिन्याला मेगा ब्लॉक घेण्यात येत आहेत. वारंवार घेणाऱ्या येणाऱ्या ब्लॉकमुळे गाड्या रद्द होण्याचे याबाबतीत रेल्वे प्रवासी ग्रुपने वारंवार पाठपुरावा करून ब्लॉक शनिवारी व रविवारी घेण्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार गेल्या काही महिन्यांपासून हे ब्लॉक दर शनिवारी घेण्यात येत आहेत. शनिवारी गाड्या रद्द करुन देखील अन्य दिवशीही गाड्या रद्द करण्यात येत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून निजामाबादहून पुण्याकडे येणाऱ्या गाडीला विलंब होत आहे. यामुळे पुणे-बारामती पॅसेंजरचे नियोजन रेल्वे प्रशासनाला बदलावे लागत आहे. परिणामी, दुपारच्या सत्रात धावणाऱ्या गाड्यांवर होत असून अनेक गाड्या रद्द करण्यात येत आहेत. यामुळे प्रवाशांचा खोळंबा होऊन त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती रेल्वे प्रवासी ग्रुपचे सचिव दिलीप होळकर यांनी दिली.