पक्षनिधीचे देशोदेशीचे कायदे

अमेरिका : राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना व्यक्‍ती अथवा संस्था, कंपनी यांच्याकडून निधी घेण्यास परवानगी आहे; मात्र उमेदवारांना मिळालेल्या निधीचा स्रोत सांगावा लागतो. अनामिकांकडून निधी स्वीकारण्यास बंदी आहे. निवडणूक निधी म्हणून गोळा केलेल्या पैशाचा हिशेब सरकारला सादर करावा लागतो. खोटा हिशेब सादर केल्यास उमेदवार आणि त्याचा पक्ष यांना दंड केला जातो. परदेशी व्यक्‍तींकडून निवडणुकीसाठी निधी घेण्यास उमेदवारांना मनाई आहे. प्रचारासाठी किती खर्च करावा यासाठी बंधन नाही. उमेदवार अथवा पक्षाला निधी देताना एखाद्या व्यक्‍तीला जास्तीत जास्त 1.6 लाख म्हणजेच 2600 अमेरिकन डॉलर इतकाच निधी देता येतो. सरकारी बॅंका, संघटना, प्रांतांतील सरकारे, कंत्राटदार यांच्याकडून निवडणूक निधी घेता येत नाही.

इंग्लंड : इंग्लंडमध्ये निवडणुकीचा खर्च सरकारकडून केला जातो. यासाठी इथल्या सरकारकडून खासदार असलेल्या पक्षांना दरवर्षी 20 कोटी एवढा निधी दिला जातो. निवडणुकीवेळी सरकारी प्रसारमाध्यमांमधून उमेदवार आणि पक्षांना आपली भूमिका मांडता येते. यासाठी सरकारी प्रसारमाध्यमांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच सभा, मेळावे घेण्यासाठी सरकारी इमारती मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. उमेदवाराने कोणाकडून निधी घ्यावा यासाठी बंधने आहेत. ब्रिटनच्या नागरिकाकडूनच व ज्याचे नाव मतदार म्हणून नोंदले गेले आहे अशा व्यक्‍तीकडूनच निवडणूक निधी स्वीकारला जातो. त्याचबरोबर ब्रिटनच्या कायद्यानुसार नोंदणी झालेली कंपनी, कामगारसंघटना यांच्याकडूनच निधी स्वीकारता येतो.

प्रचार मोहिमेवेळी प्रत्येक मतदारामागे ग्रामीण भागात 7.3 लाख रुपये एवढा खर्च करता येतो. शहरी भागात ही मर्यादा 7.5 लाख रुपये एवढी आहे. राजकीय पक्षांना प्रत्येक मतदारसंघावर 30.5 लाख एवढा खर्च करण्याची मुभा आहे. सरकारने निश्‍चित केलेल्या स्त्रोतांखेरीज अन्य स्रोतांकडून निवडणूक निधी स्वीकारल्यास त्या उमेदवारावर फौजदारी कायद्यानुसार कारवाई होते. त्याचबरोबर उमेदवार आणि पक्षाने आपल्या खर्चाचा हिशेब सादर करण्यास विलंब लावला तर त्यांच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल होतो. उमेदवाराच्या प्रचारपत्रकावर ते पत्रक कोणी प्रसिद्ध केले आहे याचा उल्लेख करणे आवश्‍यक असते.

कॅनडा : उमेदवारांकडून निवडणुकीत केल्या जाणाऱ्या खर्चापैकी काही रक्‍कम सरकारकडून परत दिली जाते. उमेदवारांना सरकारी प्रसारमाध्यमातून आपली भूमिका कोणतेही शुल्क न देता मांडता येते. उमेदवारांना वैयक्‍तिक निधी म्हणून जास्तीत जास्त 2.7 लाख एवढाच निधी देता येतो. राजकीय पक्षांना निधी देण्याची मर्यादा 1100 डॉलर इतकी आहे. कॅनडाचे नागरिक असणाऱ्यांकडूनच निवडणूकनिधी स्वीकारता येतो.

फ्रान्स : फ्रान्समध्ये उमेदवारांना जास्तीत 4 लाख रुपये वैयक्‍तिक देणगी म्हणून देता येतात. फक्‍त व्यक्‍तिगत निधी स्वीकारला जातो. कंपन्या, संस्था आदी स्रोतांकडून निवडणूक निधी गोळा करता येत नाही. अध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना 136 कोटी रुपये खर्च करण्याची मुभा आहे. संसदेच्या निवडणुकीत उमेदवारांना जास्तीत जास्त 34 लाख रुपये खर्च करता येतात. उमेदवारांनी निवडणूक खर्चाचे विवरणपत्र सादर केले नाही तर त्याची निवड रद्द करण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)