बेशुद्धावस्थेत सोडले सुपा घाटात रस्त्याचे कडेला
शिक्रापुर पोलिसठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल
शिक्रापुर – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री यांचे चिरंजीव व मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या गाडीच्या चालकाचे अपहरण करुन सदर चालकाला मारहाण करुन त्यास सुपा ता. पारनेर जि. अहमदनगर येथील घाटात बेशुद्धावस्थेत सोडून दिले असल्याची घटना घडली असून याबाबत शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री यांचे चिरंजीव पार्थ अजित पवार यांचा चालक मनोज सातपुते याने दिलेल्या फिर्यादीनुसार पार्थ पवार यांच्या सोबत चालक मनोज सातपुते मुंबई येथे गेला होता. ५ जुलै रोजी मनोज काही खासगी कामानिमित्त बाहेर पडला असता एका लाल रंगाच्या ओमनीमध्ये आलेल्या काही इसमांनी मनोज यास तु पार्थ पवार यांचा चालक का आहे का अशी विचारणा केली तसेच आम्हाला पार्थ यांना एक वस्तू देण्यासाठी जायचे आहे असा बनाव रचत त्याला गाडीत बसवले. मात्र त्यानंतर ६ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास मनोज शुद्धीवर आला व त्याला जाग आली तेव्हा मनोज हा सुपा ता. पारनेर या अहमदनगर जिल्ह्यातील घाटात रस्त्याच्या कडेला पडलेला होता. मनोजचे कपडे फाटलेले तर उजव्या पायाच्या करंगळीतून रक्त येत होते तसेच मनोजचा मोबाईल त्याच्या जवळ नव्हता.
एका एसटीला हात करत मनोज सणसवाडी येथे पोहोचल्यानंतर सदर प्रकरण उघडकीस आले असून शिक्रापूर पोलिसांनी सदर प्रकरणी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा पुढील तपासणीसाठी मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे.