#व्यक्तिमत्व : लोक काय म्हणतील (भाग 1)

-सागर ननावरे

एका मध्यमवर्गीय घरातील मुलीचे लग्न ठरले होते. मुलगी लाडाची त्यामुळे लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. खर्चाचा काही प्रश्‍नच नव्हता. तयारीसाठी सर्व पाहुणेमंडळी आठवडाभर आधीच घरी आली होती. पाहुणचाराचा आनंद घेत होते. लग्नाच्या आधी काही दिवस लग्नाच्या मंडपातील नियोजनासाठी सर्वांची चर्चा करण्यात आली होती महत्त्वाचा विषय होता “भोजनाचा मेन्यू काय ठेवायचा?’

मुलीचे वडील बोलले,” भात, वरण, भाजी, चपाती ठेवूया” तेवढ्यात एक पाहुणा बरळला,” घरातील पहिलेच लग्न आहे, लोक काय म्हणतील? चपाती नको पुरी ठेवा” दुसरा एकजण बोलला,” अहो शुभकार्य आहे आणि जेवणात गोडधोड नाही? लोक नावं ठेवतील. त्यासोबत बुंदी ठेवा.”

-Ads-

पुढे लगेच एक पाहुणी बोलली, “अहो बुंदीचा जमाना गेला. त्यापेक्षा गुलाबजाम, म्हैसूरपाक वगैरे ठेवा. या साऱ्या चर्चेत मुलीच्या वडिलांची मात्र मनातल्या मनात अपेक्षित खर्चाची आकडेमोड चालली होती.

साऱ्या पै पाहुण्यांच्या सल्ल्यानुसार जेवणाचे नियोजन ठरले. लग्नाचा दिवस उजाडला. लोक जेवणाला बसले. लग्नात काही कमी पडायला नको म्हणून मुलीचा बाप जेवणानंतर प्रत्येकाकडे जाऊन “जेवण कसे झाले असे विचारू लागला”.

खूप उत्तम झाले या शब्दासाठी त्या बापाचे कान आतुरले होते; परंतु त्याच्या कानावर पडलेल्या शब्दांनी मात्र त्याच्या कपाळावर आठ्या रेखाटल्या. ती उत्तरे अशी होती. ‘जीरा राइस असायला हवा होता’, जेवणांनंतर आईस्क्रिम हवी होती” पुऱ्या जरा जास्तच तेलकट होत्या’ इ.

मुलीच्या बापाला कळून चुकले होते “लोक काय म्हणतील” यात अडकून पडण्यापेक्षा “ऐकावे जनाचे करावे मनाचे” या विचाराने चाललो असतो तर आज तितके दुःख झाले नसते. हा तर एक साधा प्रसंग होता. अशा अनेक प्रसंगांना आपण दररोज तोंड देत असतो. हे केले तर ते काय म्हणतील? आणि ते केले तर हे काय म्हणतील? यातच आपली मानसिकता पोखरली जात असते.

माणसाने अगदी लहान निरागस मुलाप्रमाणे जगायला हवे. कोणाला काय वाटेल यापेक्षा आपल्याला कशातून आनंद मिळेल याचा विचार करायला हवा. अगदी मनसोक्‍तपणे जीवन जगायला हवे. परंतु आपण बालपणातून जसजसे मोठे होत जातो तसतसा आपला रिमोट इतरांच्या हाती जातो.

त्यांना कसे वाटेल याचा विचार करून आपण आपले आयुष्य इतरांच्या विचारांच्या स्वाधीन करीत असतो. मी कोण आहे? माझे ध्येय काय? मला काय करायचे आहे? यापेक्षा लोकांना आपण केलेले अमुक-तमुक आवडेल काय? या मानसिकतेचे आपण गुलाम होऊन जातो.

#व्यक्तिमत्व : लोक काय म्हणतील (भाग 2)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)