पारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू 

विधानसभेच्या तोंडावर प्रशांत गायकवाडांच्या अडचणी वाढविण्याचा प्रयत्न

नगर/पारनेर – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उमेदवारीसाठी पारनेर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा धुसफूस सुरू झाली आहे. पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या विरोधात पुन्हा एकदा संचालकांनी बंड पुकारले आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट घेऊन सभापती गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गायकवाड यांनी राजीनामा द्यावा, नाही तर आमचे राजीनामे घ्यावेत, असा पवित्रा संचालकांनी घेतला आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

यापूर्वीही प्रशांत गायकवाड यांच्या राजीनाम्याबाबत सात-आठ महिन्यांपूर्वी सर्व संचालकांनी अविश्‍वास ठराव राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे दाखल केला होता. परंतु हा ठराव पास झाला नव्हता. आता पुन्हा या संचालकांनी झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजीनाम्याची मागणी केली असून, गायकवाड यांना विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर अडचणीत आनण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. तसतसा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधिल बेबनाव उघड होत आहे. यापूर्वी शिवसेनेचे निलेश लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने सुजित झावरे व लंके यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. दोन्ही नेते सवता सुभा मांडून स्वत: चे आस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे यांच्या अंतर्गत वादामुळे राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्‍यता आहे.

जिल्हापरिषद सदस्य झावरे, निलेश लंके, सभापती गायकवाड हे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय मोर्चे बांधणी करत आहे. त्यामुळे पारनेर तालुक्‍यात राष्ट्रवादीतच तीन गट निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. याचा फायदा शिवसेनेचे विधानपरिषदेचे उपाध्यक्ष व आमदार विजय औटी यांना याचा निश्‍चितच फायदा होणार असल्याचे ही बोलले जात आहे. त्याचात परिपाक म्हणून आज बाजार समितीचे उपसभापती विलास झावरे यांच्यासह गंगाराम बेलकर, राजेश भंडारी, अरुण ठाणगे, विजय पवार, राहुल जाधव, सोपान कावरे, खंडू भाईक, मीराबाई वरखडे यांनी पवार यांची भेट घेतली.

यावेळी सर्वच संचालकांनी गायकवाड यांच्या कारभाराविषयी तक्रार केल्या. बाजार समितीत भरविण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात देण्यात आलेले स्टॉल कसे दिले, याची माहिती आम्हाला देण्यात आली नाही, बाजार समितीमार्फत चालविण्यात आलेल्या चारा छावणीत गैरव्यवहार झाला आहे. आताही कोणत्याच निर्णयाविषयी आम्हाला विचारत घेतले जात नाही. बाजार समितीत विविध कामांचे कंत्राट दिले जाते. त्यामध्येही संचालंकाना विश्वासात घेतले जात नाही. एकूणच समितीमधील कारभार संचालकांना विचारत न घेतला सुरू आहे, असे सांगत सभापती गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

बाजार समितीमधील कारभार हा पारदर्शीपणेच सुरू आहे. कृषी प्रदर्शन व चारा छावणी हे ना नफा ना तोटा या तत्त्वावर घेतलेले उपक्रम आहेत. त्यामुळे त्यात गैरव्यवहार होणारच नाही. आजपर्यंत शेतकरी हिताचेच निर्णय घेत आलो आहे. यापुढेही ते घेऊ.

प्रशांत गायकवाड , सभापती, बाजार समिती, पारनेर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)