नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळातील संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज कॉंग्रेस संसदीय मंडळाच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी त्यांनी संसद अधिवेशनातील कार्यक्रम पत्रिकेबाबत चर्चा केली. संसदेचे अधिवेशन येत्या 17 जून पासून सुरू होत आहे. ते 26 जुलै पर्यंत चालणार आहे. 5 जुलैला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
सतराव्या संसदेच्या पहिल्या अधिवेशनाच्या निमीत्ताने विरोधी पक्षांना विश्वासात घेण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून संसदीय कामकाज मंत्री विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटत आहेत. त्यानिमीत्ताने प्रल्हाद जोशी यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. त्या खेरीज त्यांनी आज राज्यसभेतील कॉंग्रेसचे नेते गुलामनबी आझाद, आणि द्रमुक पक्षाचे नेते टी आर बालू यांचीही भेट घेतली. सरकार या अधिवेशनात दहा अध्यादेशांचे कायद्यात रूपांतर करण्याचे प्रस्ताव संसदेत मांडणार आहे. त्यात ट्रिपल तलाकला कायद्याने बंदी घालण्याच्या प्रस्तावाचा समावेश आहे. हा प्रस्ताव सध्या अध्यादेशाद्वारे देशात अंमलात आणण्यात आला असून फेब्रुवारी मार्च महिन्यात सरकारने त्या विषयीचा अध्यादेश जारी केला होता.