परेश रावल लोकसभा निवडणूक लढणार नाहीत

गांधीनगर -भारतीय जनता पार्टीचे नेते आणि अभिनेते परेश रावल यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे निवडणूक न लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघातून परेश रावल भाजपाच्या तिकिटावर लढले होते. याठिकाणी परेश रावल यांनी कॉंग्रेसचे उमेदवार हिंमतसिंह पटेल यांना 3 लाखांहून अधिक मतांनी पराभूत केले होते.

मागील 2014 च्या निवडणुकीत अभिनेता परेश रावल यांना 6 लाख 33 हजार 582 मते मिळाली होती. तर कॉंग्रेसच्या हिंमतसिंह यांना 3 लाख 6 हजार 949 मतांवर समाधान मानावे लागले होते. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. पहिल्या यादीत 184 उमेदवारांची नावे होती, दुसऱ्या यादीत बऱ्याच नावांचा समावेश होता.

तर शुक्रवारी मध्यरात्री भाजपाने तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये आंध्र प्रदेशमधील 23, महाराष्ट्रातील 6, ओडिशामधील 5 तर मेघालय आणि आसाममधील प्रत्येकी एका जागेवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. याआधीही भाजपाच्या केंद्रीय मंत्री कलराज मिश्र, सुषमा स्वराज आणि उमा भारती यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचे जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)