पुणे – शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या खात्यांवर जी रक्कम जमा करण्यात येणार आहे, ती शालेय साहित्य आणि गणवेशासाठीच खर्च करण्याबाबत पालकांना समज देण्यात येणार असल्याची माहिती कामगार कल्याण अधिकारी शिवाजी दौंडकार यांनी दिली. त्यांच्याकडे शिक्षण मंडळाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.
शालेय साहित्य आणि गणवेश खरेदीसाठी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे बॅंक अकाऊन्ट उघडण्यात आले आहे. झिरो बॅलन्सने हे अकाऊन्ट उघडण्यात आले आहे. या संबंधि लेखापालांनी बॅंकांशी चर्चाही केली असून त्यांना तसे पत्रही देण्यात आले आहे.
या खात्यांमध्ये जमा केलेली रक्कम त्या विद्यार्थ्यांच्या साहित्यासाठीच खर्च केली जात नसल्याची तक्रार या आधी करण्यात आली होती. हे पैसे पालकांकरवी अन्य गोष्टींवर खर्च करण्यात येत असल्याचीही तक्रार होती. मात्र यंदा, ही रक्कम विद्यार्थ्यांच्या साहित्यावरच खर्च केली जावी असा समज पालकांना देणार आहे. अन्यथा ती रक्कम वसूल केली जाईल, असेही त्यांना सांगण्यात येणार असल्याचे दौंडकर यांनी सांगितले.