पंकजा मुंडेंचा आज खरवंडीत “एल्गार’!

भगवानगडाच्या पायथ्यावरून काय राजकीय संदेश देणार?

पाथर्डी – भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या खरवंडी कासार येथे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत आज दुपारी एक वाजता ऊसतोडणी कामगार व मुकादमांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्‍नांबाबत गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांच्यावर ऍड. प्रताप ढाकणे यांनी केलेली टीका आणि भगवानगडावरचा दसरा मेळावा रद्द झाल्यानंतरचा पायथ्याशी होणारा राजकीय मेळावा हा मुंडे भगिनींसाठी महत्त्वाचा असून त्या त्यातून काय संदेश देणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

-Ads-

ऊसतोडणी कामगारांच्या मागण्यासंदर्भात व संपासंदर्भात मुंडे याच मेळाव्यातून भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे राज्यातील साखर कारखानदारांचे ही लक्ष लागले आहे.यापूर्वी अनेक वर्षे भगवानगडावरील दसरा मेळाव्यात गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगारांच्या संपाची दिशा ठरवत होते. दसरा मेळाव्यातून तोडणी कामगारांच्या संपाविषयीच्या भूमिकेबरोबरच मला भगवानगडावरून दिल्ली दिसते, मुंबई दिसते अशा सांकेतिक भाषेत ते आपल्या राजकीय वाटचालीचे रणशिंग फुंकले जायचे.

ऊसतोडणी कामगाराबरोबरच मुंडे समर्थकही या मेळाव्यातून वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा घेऊन संघटन कामाला लागत होते. भगवानगडावरील भाषणबंदीच्या निर्णयानंतर दसरा मेळावा खंडित झाला. दसरा मेळाव्यातील पंकजा यांच्या भाषणावरून निर्माण झालेला वाद व संघर्ष सर्वज्ञात आहे. भगवानगडावरील दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झाल्यानंतर पंकजा या प्रथमच भगवानगडाच्या पायथ्याशी ऊसतोडणी कामगारांचा मेळावा घेत आहेत. राज्यातील ऊसतोड कामगार हलाखीचे जीवन जगत आहे.

पोट भरण्यासाठी जीवघेणे काम करत आहेत. त्यांना अल्प मोबदला मिळतो. अंतरिम दरवाढ घोषित झाली; मात्र तिची अंमलबाजावणी होत नाही. ती व्हावी, उसतोडणी दरात दुप्पट वाढ करावी, मुकादमास 35 टक्के कमिशन करावे, वाहतूक भाडेवाढ व्हावी, ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी निवासी शाळा व वसतिगृहांची सोय व्हावी यांसह विविध मागण्या आहेत. पकंजा या विषयांवर काय बोलतात, याबरोबरच अन्य काय राजकीय भाष्य करतात, राज्याचे लक्ष लागले आहे.

संयोजक समितीने मेळाव्यासाठी खूप तयारी केली आहे. भव्य सभामंडप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण तालुक्‍यात मुंडे भगिनींच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार मोनिकाताई राजळे असून मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी केले आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी आ. राजळे, नगराध्यक्ष डॉक्‍टर मृत्युंजय गर्जे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सोमनाथ खेडकर, गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी मजूर, मुकादम व वाहतूकदार संघटनेचे मार्गदर्शक राहुल कारखेले, भाजपचे उपाध्यक्ष संजय कीर्तने, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, धनंजय बडे आदी प्रयत्नशील आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)