पंजाब नॅशनल बँकेला ‘एवढ्या’ कोटींचा तोटा 

अनुत्पादक मालमत्ता व घोटाळ्यांमुळे करावी लागली मोठी तरतूद 
बॅंकेच्या कर्ज वसुली मोहिमेला उत्तम यश मिळाले आहे. मात्र नीरव मोदी घोटाळा आणि जुन्या अनुत्पादक मालमत्तेमुळे बॅंकेला मोठी तरतूद करावी लागली. त्यामुळे पहिल्या तिमाहीत तोटा झाला तरी वर्षाच्या अखेरीस पंजाब नॅशनल बॅंक नफ्यात येईल. 
सुनील मेहता, व्यवस्थापकीय संचालक, पीएनबी 
नवी दिल्ली: घोटाळे आणि एनपीएमुळे त्रस्त असलेल्या पीएनबी बॅंकेला पहिल्या तिमाहीतही 940 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. या तिमाहीत बॅंकेने नेटाने 8445 कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली करूनही बॅंकेला तोट्याला सामोरे जावे लागले आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत बॅंकेला 343 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
या तिमाहीत बॅंकेचे उत्पन्न मात्र वाढून 15072 कोटी रुपयांवर गेले आहे, जे की गेल्या वर्षी या तिमाहीत 14468 कोटी रुपये इतके होते. बॅंकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता वाढून 18.26 टक्‍क्‍यांवर गेली आहे. बॅंकेने कर्ज वसुली मोहीम राबवायचे ठरविले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत बॅंक नफ्यात येणार असल्याचा दावा बॅंकेच्या व्यवस्थापनाने केला आहे.
बॅंकेत 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. त्या रकमेच्या 50 टक्‍के तरतूद करण्याची सूचना रिझर्व्ह बॅंकेने केली असतानाही बॅंकेने त्या रकमेच्या तब्बल 63 टक्‍के तरतूद केली आहे. हा घोटाळा उजेडात आल्यानंतर बॅंकेला गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत तब्बल 13416 कोटी रुपयांचा तोटा दाखवावा लागला होता. आता या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत बॅंक 20 हजार कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली करणार असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.
पहिल्या तिमाहीत किमान 7 हजार कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली करायचे बॅंकेने ठरविले होते. मात्र आतापर्यंत बॅंकेने तब्बल 8445 कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली केली आहे. यातील 3200 कोटी रुपये भूषण स्टिलकडून आले आहेत. दुसऱ्या तिमाहीत बॅंकेने किमान 11 हजार कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली करायचे ठरविले आहे त्याचबरोबर बॅंक या वर्षात फारशी उपयोगाची नसलेली 8600 कोटी रुपयांची मालमत्ता विकणार आहे. सरकारकडूनही बॅंकेला गेल्या महिन्यात 2816 कोटी रुपये मिळाले आहेत.
बॅंकेने सादर केलेल्या या ताळेबंदानंतर बॅंकेचा शेअर आज तब्बल 8 टक्‍क्‍यांनी कोसळला. त्यामुळे बॅंकेचे बाजार मूल्य एकाच दिवसात 2014 कोटी रुपयांनी कमी होऊन 22871 कोटी रुपयांवर आले. बॅंकेचे एपीए 8.67 टक्‍क्‍यावरून 10.58 टक्‍के झाले आहे. हा गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)