पालघर – महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या उद्योगपतीचे प्रेत मारेकऱ्यांनी जाळून टाकून ते जंगलात टाकून दिलेलेही आढळून आले आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली असून एका महिलेलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. व्यावसायित स्पर्धेतून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा कयास आहे.
आरिफ शेख असे मरण पावलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांचा स्पेअर पार्ट मशिनरी विकण्याचा व्यवसाय होता. त्यांची पालघरला फॅक्टरीही होती. गेल्या गुरूवारी ते रिक्षातून आपल्या फॅक्टीकडे जात असताना काही अज्ञात इसमांनी त्यांचे अपहण केले आणि नंतर त्यांनी त्यांची हत्या केली. नंतर त्यांचे प्रेत डहाणू जवळील डोंगरात नेऊन जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी याच भागातील एक व्यावसायिक प्रशांत शंके आणि त्यांच्या अन्य दोन साथीदारांना अटक केली आहे. शंके याला गुजरातमधील वापी मधून अटक करण्यात आली आहे.