सईदच्या अटकेवर शिवसेनेची प्रतिक्रिया
मुंबई : पाकिस्तान सरकारने हाफिजला अटक करायची आणि नंतर न्यायालयाने त्याला जामिनावर मोकळे करायचे या नाटकाचे यशस्वी प्रयोग आतापर्यंत दोनदा केले गेले आहेत. आता दिवाळखोरीच्या सावटाखाली असलेल्या पाकिस्तानने याच नाटकाचा तिसरा प्रयोग सादर केला आहे. ही आणखी एक धूळफेक आहे की नाही हे हाफिजविरोधातील खटला कसा चालतो यावर समजेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेने सामना अग्रलेखातून दिली आहे.
मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याला अखेर पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. अर्थात ही खरी अटक आहे की अटकेचे नाटक आहे. हे पाकिस्तान आणि त्या हाफिजलाच माहीत. असे शिवसेनेने सांगितले. दरम्यान, सईदला अटक झाल्याने भारताला मोठे यश मिळाले आहे. सध्या सईदची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.