अंतराळाचे लष्करीकरण करण्यात येऊ नये 

पाकिस्तानची टीका
इस्लामाबाद – भारताने केलेल्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणीवर पाकिस्तानने आज चांगलाच थयथयाट केला. अंतराळाचे लष्करीकरण करण्याला पाकिस्तानचा विरोध आहे, अशा शब्दात पाकिसानने या क्षेपणास्त्र चाचणीवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्षेपणास्त्र चाचणीची माहिती जाहीर केल्यानंतर लगेचच पाकिस्तानने ही प्रतिक्रिया दिली आहे.

उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित करणाऱ्या अमेरिका, रशिया आणि चीन या देशांच्या रांगेत आता भारताला स्थान मिळाला असल्याने पाकिस्तानकडून ही खोचक प्रतिक्रिया दिली आहे. अंतराळ हे सर्व देशांच्या मानवासाठी सामायिक वारसा आहे. त्याचे लष्करीकरण करण्यात येऊ नये. असे लष्करीकरण करण्याच्या कोणत्याही कृत्याला विरोध करण्याची जबाबदारी प्रत्येक देशाची असली पाहिजे, असे पाकिस्तानचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्‍ते मोहम्मद फैजल यांनी एका निवेदनामध्ये म्हटले आहे.

अंतराळातील शस्त्रास्त्र स्पर्धेला विरोध करण्याबाबत संयुक्‍त राष्ट्राने केलेल्या ठरावाचे पाकिस्तान ठाम समर्थक आहे, असेही फैजल यांनी म्हटले आहे. मात्र अंतराळातील शस्त्रास्त्रस्पर्धेमध्ये उतरण्याचे भारताचे कोणतेही उद्दिष्ट नाही, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. अंतराळाचा वापर शांतता अबाधित राखणयसाठीच केला जायला हवा, असेही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)