#CWC19 : पाकिस्तानवर नामुष्कीची टांगती तलवार

बाद फेरीच्या आशा धूसरच

लंडन – इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर उपांत्य फेरी गाठणे हे पाकिस्तानसाठी स्वप्नरंजनच झाले आहे. आज अखेरच्या लढतीत त्यांना बांगलादेशसारख्या तुल्यबळ संघाविरुद्ध सामोरे जावे लागणार आहे. अशक्‍यप्राय विजय मिळविला तरच त्यांना बाद फेरीची संधी आहे. बांगलादेशची येथील कामगिरी पाहता हा चमत्कार घडणे अशक्‍यच आहे. त्यामुळेच साखळी गटातच आव्हान संपुष्टात येण्याची नामुष्की पाकवर येणार आहे.

स्पर्धेतील अखेरचा सामना जिंकून गोड सांगता करण्यासाठी बांगलादेश कसोशीने प्रयत्न करील अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीनेच यशस्वी अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन याच्यावर त्यांची भिस्त आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत पाचशेपेक्षा जास्त धावा केल्या आहेत, तसेच त्याने फिरकी गोलंदाज म्हणूनही आपला ठसा उमटविला आहे.

मोहम्मद सैफुद्दीन याने भारताविरुद्ध संघास विजयाच्या समीप नेले होते. आज या दोघांबरोबरच तमिम इक्‍बाल, सौम्या सरकार व महमदुल्लाह यांच्याकडूनही चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे. कर्णधार मशरफे मोर्तझा याचे अपयश हीच त्यांच्यासाठी डोकेदुखी आहे. आजच्या सामन्यात त्याने प्रभाव दाखवावा हीच संघव्यवस्थापनाची अपेक्षा आहे. त्याच्याबरोबरच मुस्ताफिझूर रेहमान याच्या कामगिरीबाबत उत्सुकता आहे. त्याने भारताविरुद्ध पाच विकेट्‌स घेतल्या होत्या.

शाहीन आफ्रिदी, मोहम्मद आमीर व वहाब रियाझ हे पाकिस्तानच्या गोलंदाजीची धुरा सांभाळत आहेत. या लढतीतही ते पुन्हा यश मिळवतील असा अंदाज आहे. बाबर आझम, असिफ अली, फखर झमान, हॅरिस सोहेल यांच्यावर त्यांच्या फलंदाजीची मदार आहे.

प्रतिस्पर्धी संघ :

बांगलादेश – मशरफे मोर्तझा (कर्णधार), लिट्टन दास (यष्टीरक्षक), तमीम इक्‍बाल, सौम्य सरकार, मुशफकीर रहीम, शकीब अल हसन, अबू जायेद, महमदुल्लाह, मेहंदी हसन मिर्झा, मोहम्मद मिथुन, मोहम्मद सैफुद्दीन, मोसादेक हुसैन, मुस्ताफिझूर रेहमान, रुबेल हुसैन, सब्बीर रहमान.

पाकिस्तान – सर्फराझ अहमद (कर्णधार आणि यष्टीरक्षक), बाबर आझम, आसिफ अली, फखर झमान, हॅरिस सोहेल, हसन अली, इमाद वासिम, इमाम उल हक, मोहम्मद आमीर, मोहम्मद हफीझ, मोहम्मद हसनैन, शदाब खान, शाहीन आफ्रिदी, शोएब मलिक, वहाब रियाझ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)