नवी दिल्ली- दहशतवादाबाबत जर पाकिस्तान गंभीर असेल, तर दाऊद इब्राहिम, सय्यद सलाहुद्दीन आणि अन्य दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात देण्यात यावे, असे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे. पुलवामामधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानकडून जैश ए मोहम्मदविरोधात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. दहशतवादाबाबत भारताकडून व्यक्त होत असलेल्या चिंतेबाबत जर पाकिस्तानला खरोखर आपली भूमिका प्रामाणिक असल्याचा संदेश द्यायचा असेल, तर दाऊद इब्राहिम, सय्यद सलाहुद्दीन आणि भारताला हवे असलेले अन्य दहशतवादी भारताच्या स्वाधीन करण्यात यावेत. पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसात जैश ए मोहम्मदविरोधात केलेली कारवाई म्हणजे केवळ कारवाईचा देखावा आहे. त्यामधून काही साध्य झालेले नाही, असेही या सरकारी सूत्रांनी सांगितले.
भारताने आतापर्यंतच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या नावांच्या यादीसह अन्य पुरावेही पाकिस्तानला दिले आहेत. हे दहशतवादी पाकिस्तानच्या भूमीवरून सक्रिय असल्याचे पुरावेही पाकिस्तानला देण्यात आले आहेत. हे पुरावे त्रयस्थांकडून तपासूनही घेतले जाऊ शकतात.