पाकने आत्मवंचनेतून बाहेर यावे (अग्रलेख)

हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अर्थात “आयसीजे’ने पाकिस्तानला जोरदार दणका दिला. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेचा पाकने फेरविचार करावा, असा आदेश आयसीजेने त्या देशाला दिला आहे. पंधरा विरुद्ध एक अशा मतफरकाने भारताच्या बाजूने हा निकाल देण्यात आल्याने पाकिस्तानची नाचक्‍की झाली आहे. दोन वर्षांपूर्वीही या न्यायालयाने आपल्या अंतरिम निकालात जाधव यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यावर आता शिक्‍कामोर्तब झाले आहे. जाधव यांना पाकने कथित हेरगिरीच्या आरोपांखाली अटक केली आहे.

त्यांच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांच्यावर दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचे आरोप करत त्यांना फाशीची शिक्षाही सुनावली आहे. आयसीजेच्या निकालाने यावर आता स्थगिती आली असून आम्ही न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करू, असे पाकला जाहीरपणे सांगावे लागले आहे. गेल्या वेळेचा अनुभव जमेस धरत पाकने या सुनावणीच्या वेळी दोन वकिलांना मैदानात उतरवले होते. मात्र, केवळ 1 रुपयांत जाधव यांची केस लढणारे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी पाकच्या मनसुब्यांवर पाणी फेरत त्यांना मात दिली. त्यांनी उपस्थित केलेला व्हिएन्ना कराराचा मुद्दा प्रभावी ठरला. करारानुसार जर जाधव यांना पाकने अटक केली होती, तर त्याची त्यांनी भारताला तातडीने माहिती देणे बंधनकारक होते.

मात्र, पाकने भारताला तब्बल तीन आठवड्यांनंतर याबाबत कळवले. जाधव यांना वकिलातीची मदत उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती भारताकडून औपचारिकपणे करण्यात आली होती. त्याबाबतही पाकची नकारघंटाच होती. आयसीजेने त्यावरूनही पाकवर ठपका ठेवला आहे. ज्या न्यायिक प्रक्रियेच्या आधारावर जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्याचाच फेरआढावा घेण्याचे निर्देश तर न्यायालयाने दिलेच, मात्र, सोबतच जाधव यांना वकिलातीकडून मदत घेता येण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचेही निर्देश दिले आहेत. पाकला हा दणका आहेच, मात्र, भारताचाही हा पूर्ण विजय असल्याचे मानून चालणार नाही. त्याला कारण जाधव यांची अद्याप सुटका झालेली नाही.

विश्‍वासघाताचा आणि दगाबाजीचा पाकचा इतिहास आहे. तो पाहता जाधव मायदेशी परत येईपर्यंत गाफील राहता येणार नाही. काही वर्षांपूर्वीच सरबजीत या भारतीय कैद्याचा पाकिस्तानातील तुरुंगात ज्या दगाफटक्‍याने मृत्यू झाला ते विसरून चालणार नाही. पाकिस्तान जे बोलतो ते कधीच करत नाही याची सर्व जगाला कल्पना आहे. आपल्या या प्रवृत्तीमुळेच तो देश आज जगाच्या नकाशावर सर्वच बाबतींत धोकादायक आणि किंचितही विश्‍वासपात्र राहिलेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची सर्वत्र ही अशी काळीकुट्ट प्रतिमा असतानाच, देशांतर्गत पातळीवरही फार मोठे त्यांना साध्य करता आलेले नाही. आज आर्थिक बाबतीत हा देश पूर्णत: रसातळाला गेला आहे. नव्या सत्ताधाऱ्यांनी जुन्या सत्ताधाऱ्यांना तुरुंगात टाकायचे, एवढेच कशाला चक्‍क फासावरही लटकावल्याचे प्रकार त्यांच्याकडे राजरोस होतात.

संपूर्ण जगाने ते पाहिले आहे. सरकारला नाचवणारे लष्कर हा सगळा खेळ आपल्या दहशतीच्या जोरावर करत असते. बऱ्याचदा त्यांनी सत्ताधारी निर्माण करण्याबरोबरच सत्ता राबविण्यातच रस दाखवला आहे. त्यामुळे स्वतंत्र झाल्यावर जवळपास पाऊण शतक झाले तरी आज या देशात लोकशाही उभी राहू शकली नाही. भारतासोबत त्यांचा उभा दावा आहे. फाळणीच्या जखमा जरी कायमच्या भरल्या जाणार नसल्यातरी मागचे विसरण्याचा प्रयत्न करत पुढे जायचे असते. तेही पाकिस्तानातील राज्यकर्त्यांना जमलेले नाही. भारतासोबतचे वैमनस्य त्यांनी कुरवाळत ठेवत भारतद्वेषासाठी इंधन म्हणून त्याचा सातत्याने वापर केला. अंतर्मनच जर काळवंडलेले असले तर बाहेरचा प्रकाश दिसत नाही. त्यामुळेच जाधव प्रकरणाची तुलना दहशतवादी अजमल कसाबशी करण्याचा अयशस्वी प्रयत्नही पाकने करून पाहिला.

आयसीजेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केल्यानंतर संपूर्ण भारत वेठीस धरला गेला होता. जगाने ते महाभयंकर आणि नि:शस्त्र लोकांवर गोळीबार करणारे भेकड कृत्य पाहिले होते. सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केल्यावर कसाबला जिवंत पकडण्यात आले. त्याला जाहीर फाशी दिली गेली असती, तरी न्यायाची बाजू भक्‍कम होती. मात्र, भारताने त्याच्यावर खटला चालवला. त्याला मदतही उपलब्ध करून दिली. त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली. त्याचा दोष साबीत झाल्यानंतर त्याला मृत्यूदंड दिला. त्यावेळी कसाब आपला असल्याचे मानण्यासही पाक तयार नव्हता. भारत आणि पाक आज शेजारी असले तरी कधी एक होते. त्यांचा इतिहास एक आहे. मात्र, ते साम्य 1947 पर्यंतच. त्यानंतर भारतात कायद्याचे राज्य आहे.

मात्र, पाकबाबत असे म्हणण्याचे धाडस त्यांचे सध्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीही करू शकणार नाहीत. न्यायप्रणालीवर विश्‍वास नसेल तर किंबहुना न्यायप्रणालीच जर कोणाचे बाहुले बनली असेल तर काय होऊ शकते, हे खुद्द नवाज शरीफ, आसिफ झरदारी आणि त्यांच्या अन्य पूर्वसूरींनीही अनुभवले आहे. व्यक्‍तिगत आकस, द्वेष आणि सत्तातूरता याच्यापलीकडे पाकिस्तानची लोकशाही आणि तिचा इतिहास जात नाही. त्यांनी न्यायाच्या गप्पा करणे आणि अन्य देशांच्या न्यायव्यवस्थेकडे बोट दाखवण्याला त्यामुळेच काही अर्थ राहात नाही. आताही आंतरराष्ट्रीय न्यायालयात झालेली नाचक्‍की स्वीकारण्याचे धाडस त्यांच्याकडे नाही.

जाधव यांना भारताकडे सोपवण्यास नकार दिला गेल्याचे चित्र रंगवत आपणच विजयी ठरल्याचे ढोल पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या स्तरावर आणि नंतर प्रसारमाध्यमांकडूनही बडवले जात आहेत. ही आत्मवंचना त्यांच्याच मुळावर आजपर्यंत उठली आहे. त्यातून त्यांनी बाहेर पडणे आवश्‍यक आहे. अन्यथा त्यांच्या अस्तित्वालाच सुरूंग लागणार हे अटळ. जाधव यांच्याबाबत आयसीजेच्या निर्देशांचे पालन केले जाणे अपेक्षित आहे. ते केले गेले नाही, तर अन्य उपाय असल्याचे खुद्द साळवे यांनी म्हटले आहे. तर प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षेसाठी आपले सरकार कार्यरत राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही म्हटले आहे. कुलभूषण जाधव यांनाही न्याय मिळण्याची खात्री वाटते, असे त्यांनी नमूद केले आहे. पाकने ते ऐकले असेलच, त्याचा अर्थही समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)