पाकिस्तानचा पुन्हा नन्नाचा पाढा म्हणे, दाऊद आमच्या भूमीत नाही! 

इस्लामाबाद  –कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याविषयी पाकिस्तानने पुन्हा नन्नाचा पाढा वाचला. दाऊद आमच्या भूमीत नसल्याचा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने गुरूवारी केला.
दाऊद टोळीचा सदस्य जबीर मोती याच्याविरोधात सध्या ब्रिटनमधील न्यायालयात प्रत्यार्पणाचा खटला सुरू आहे.

खंडणी, मनी लॉण्डरिंगच्या आरोपावरून त्याला ताब्यात घेण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, नुकत्याच झालेल्या खटल्याच्या सुनावणीवेळी अमेरिकी ऍटर्नींचे प्रतिमापत्र सादर करण्यात आले. त्या प्रतिज्ञापत्रात दाऊद पाकिस्तानात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे गोची झालेल्या पाकिस्तानने दाऊद आपल्या भूमीत नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.

दाऊदने पाकिस्तानात आश्रय घेतला असल्याचा दावा भारताकडून सातत्याने केला जातो. त्यावर ब्रिटनमधील खटल्यामुळे एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आणि इतर गुन्ह्यांबद्दल दाऊद भारताला हवा आहे. त्याला अमेरिकेने याआधीच जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले. अल्‌-कैदा या दहशतवादी संघटनेशी दाऊदचे लागेबांधे असल्याचा अमेरिकेचा निष्कर्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)