नवी दिल्ली: पाकिस्तानने त्याच्या हवाई क्षेत्रात भारतीय विमानांना घातलेली बंदी उठवल्यानंतर पाकिस्तानमार्गे पहिले विमान दिल्लीत दाखल झाले. पाकिस्तानने अहमदाबादजवळील टेलेम हे हवाई क्षेत्र भारतीय विमानांसाठी खुले केले आहे. दुबईहून दिल्लीला येणारे इंडिगोचे विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यावर इंडिगो फ्लाईट ऑपरेशन सेंटरला पाकिस्तानच्या नागरी हवाई उड्डाण खात्याच्या (सीएए) संचालकांनी फोन करून विमान सुरक्षितपणे उतरल्याची माहिती घेत शुभेच्छा दिल्या.
सीएएचे संचालक इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हणाले की, भारतीय विमानांसाठी असलेली आम्ही आमच्या हवाई क्षेत्रातील बंदी उठवली आहे. आता या मार्गाचा इतर विमानांच्या उड्डाणासाठीही वापर करता येईल.
भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने त्यांची 11 हवाई प्रवेशाची ठिकाणे भारतीय विमानांसाठी बंद केली होती. त्यामुळे भारताची विमाने दूरच्या मार्गाने पश्चिमेकडील देशांकडे जात होती. दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडिगोने प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास दूरच्या मार्गाने प्रवास करण्याची तयारीही ठेवली होती. त्यासाठी विमानात पुरेसे इंधनही भरण्यात आले होते.