पाकिस्तानला भारताबरोबर सक्षम आणि सभ्य संबंध हवेत : इम्रान खान

करतारपूरच्या कोरिडोरचे भूमिपूजन

करतारपूर: पाकिस्तानला भारताबरोबर समर्थ आणि सभ्य संबंधांची अपेक्षा आहे. दोन्ही देश मिळून काश्‍मीरसह सर्व मुद्दयांवर तोडगा शोधू शकतात, असे प्रतिपादन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आता पुढे नेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. पंजाबमधील डेरा बाबा नानक गुरुद्वारापासून ते पाकिस्तानातील करतारपूर येथील गुरुद्वारापर्यंतच्या कोरिडोरच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या कोरिडोरच्या माध्यमातून भारतातील शीख भाविकांना करतारपूर येथे जाता येणे शक्‍य होणार आहे. या भाविकांना व्हिसाशिवाय करतारपूरपर्यंत जाण्याचे परमिट मिळवणे आवश्‍यक असणार आहे.

सिद्धू यांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी                                                                          करतारपूरच्या कोरिडोर भूमिपूजनाच्या समारंभाला आवर्जुन उपस्थित असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांचे इम्रान खान यांनी तोंडभरून कौतुक केले. सिद्धू आणि इम्रान खान दोघेही क्रिकेटपटू होते. सिद्धू यांचे अनेक फॅन पाकिस्तानमध्ये विशेषतः पंजाब प्रांतामध्ये आहेत. सिद्धू यांनी पाकिस्तानातही निवडून लढवली तरी ते विजयी होतील, असा विश्‍वास खान यांनी व्यक्‍त केला. यापूर्वी सिद्धू जेंव्हा शांतता प्रक्रियेचा आग्रह धरण्यासाठी पाकिस्तानमध्ये आले होते, तेंव्हा त्यांच्या भेटीवरून एवढा आरडा ओरडा का झाला होता, असा प्रश्‍न खान यांनी उपस्थित केला. ऑगस्ट महिन्यात इम्रान खान यांच्या शपथविधी समारंभासाठी सिद्धू यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्या समारंभानंतर सिद्धू यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली होती. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी सिद्धू हे पंतप्रधान होण्यापर्यंतची वाट बघायला लागणार नाही, अशी मार्मिक टिप्पणीही इम्रान खान यांनी केली.

शिखांचे पहिले गुरु गुरुनानक यांनी त्यांच्या आयुष्याची अखेरची 18 वर्षे येथेच घालवली होती. करतारपूर येथे 1522 साली बांधण्यात आलेला हा गुरुद्वारा शिखांचा पहिला गुरुद्वारा असल्याचे मानले जात आहे. करतारपूर कोरिडोरच्या भूमिपूजनाच्या समारंभाला पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा, सरकारी अधिकारी, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि हरदीप सिंग पुरी यांच्यासह दोन्ही देशांमधील विदेशी पाहुणेही उपस्थित होते.

“फ्रान्स आणि जर्मनी अनेक वर्षे एकमेकांविरोधात युद्ध करत होते. जर हे दोन्ही देश शांततेने राहू शकतात, तर भारत आणि पाकिस्तान का राहू शकत नाहीत.’ असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. आपापसातील संबंध सुधारण्यासाठी देवाने दिलेली संधी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांना समजत नाही. जेंव्हाही आपण भारतात जातो तेंव्हा राजकीय ऐक्‍य असल्याचे सांगितले जाते. मात्र दोन्ही देशांच्या लष्करांना ही मैत्री मान्य नाही. राजकीय नेते, लष्कर आणि अन्य संस्था एकाच बाजूला आहेत. आता पुढे जाऊन सभ्य संबंध निर्माण करायला हवेत. काश्‍मीर हा एकच प्रश्‍न दोन्ही देशांमध्ये आहे. जर चंद्रावर जाऊ शकतो, तर सोडवू शकणार नाही, असा कोणता प्रश्‍न आहे ? असा सवाल खान यांनी विचारला.

काश्‍मीरचा प्रश्‍न सोडवण्यासाठी केवळ इच्छाशक्ती आणि मोठी स्वप्ने असणे गरजेचे आहे. व्यापारी संबंध सुरळीत झाल्यावर दोन्ही देशांना त्याचा फायदा होऊ शकेल. भारताने मैत्रीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले, तर पाकिस्तान दोन पावले पुढे टाकेल. भूतकाळात दोन्ही देशांनी चूका केल्या आहेत. आता दोन्ही देशांनी भूतकाळात रहायला नको. आजच्या स्थितीमध्ये दोन्ही देश गेल्या 70 वर्षांपासून रहात आहेत. आता पुढचा विचार करायला हवा, असे ते म्हणाले. करतारपूरला येणाऱ्या भारतातील हजारो शिख भाविकांना पुढील वर्षी होणाऱ्या गुरुनानक यांच्या 550 व्या जयंती समारंभाच्यावेळी अधिक सुविधा देण्याचे आश्‍वासनही खान यांनी दिले.

करतारपूर येथे गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त हजारो शिख भाविक दरवर्षी पाकिस्तानात जात असतात. त्यांच्यासाठी हा कोरिडोर करण्यात यावा, अशी विनंती भारताने 20 वर्षांपूर्वी केली होती. केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनीही या प्रसंगी कोरिडोरबद्दल पाकिस्तान सरकारला धन्यवाद दिले. जर बर्लिनची भिंत पाडली जाऊ शकते, तर भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा विद्वेष आणि अविश्‍वास दूर केला जाऊ शकतो, असे त्या म्हणाल्या.

पंजाबमधील मंत्री आणि क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू हे देखील आजच्या समारंभाला उपस्थित होते. हा कोरिडोर शांतता प्रस्थापनेसाठी मोठी संधी देईल, अशी आशा सिद्धू यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)