कुलभूषण जाधव यांना दिली राजनैतिक संपर्काची परवानगी
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर अखेर पाकिस्तानला नमते घ्यावे लागले आहे. पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती आणली. 17 जुलै रोजी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय पाकिस्तानला दणका दिला. या निर्णयानंतर आता जाधव यांना काउन्सिलर ऍक्सेस (councillor access) देण्यात येणार आहे. ज्याद्वारे त्यांच्यासोबत राजनैतिक संपर्क करता येणार असल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने, ‘ICJच्या निर्णयाचे पालन करत जाधवांच्या Councillor Access वर ‘व्हिएन्ना’ करार अंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांची माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानी कायद्यानुसार त्यांना Councillor Access दिला जाईल, यासाठीच्या कार्यप्रणालीवर कामदेखील सुरू करण्यात आले आहे’.
या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानबीप पुन्हा एकदा गोची झाली आहे. दरम्यान, पाकिस्तानने जाधव यांना यापूर्वी तब्बल 16 वेळा राजनैतिक संपर्काचा अधिकार देण्यास नकार दिला होता. दरम्यान, कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून आलेला निर्णय म्हणजे स्पष्ट स्वरुपात भारताचा विजय आहे. बुधवारी न्यायालयाच्या 16 पैकी 15 न्यायमूर्तींनी भारताची बाजू योग्य ठरवली. जाधव यांना अटक करताना आणि त्यांच्याविरुद्ध खटला चालवताना पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले हे भारताने ठोस पुराव्यांसह सिद्ध करून दाखवले.