पाकिस्तानमध्ये दहशतवादी अड्डे नाहीत : पाक परराष्ट्र मंत्रालयाचे उत्तर

भारताने दाखवलेल्या 22 ठिकाणांची तपासणी

इस्लामाबाद – पुलवामा हल्ल्यानंतर भारताने उल्लेख केलेल्या ठिकाणी कोणतेही दहशतवादी अड्डे नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. भारताने एकूण 22 ठिकाणांची माहिती पाकिस्तानला दिली होती. त्या सर्व ठिकाणांची तपासणी करण्यात आली, मात्र तेथे कोणताही दहशतवादी अड्डा आढळला नाही. पाकिस्तानमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या 54 व्यक्‍तींचा या ठिकाणांशी अथवा पुलवामा हल्ल्याशी कोणताही संबंध असल्याचे आढळले नाही, असेही पाकिस्तानने म्हटले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या कागदपत्रांच्या प्राथमिक तपासणीचा तपशील पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज प्रसिद्ध केला. भारताने उल्लेख केलेल्या 22 ठिकाणांना प्रत्यक्ष भेटीसाठी परवानगी देण्याची तयारीही पाक परराष्ट्र मंत्रालयाने दाखवली आहे.

पाकिस्तानमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या 54 जणांची चौकशी सुरू असून या चौकशीमधून पुलवामा हल्ल्याशी संबंधित कोणतीही माहिती मिळालेली नाही, असे पाक परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. पुलवामा हल्ल्यात जैश ए मोहम्मदच प्रत्यक्ष सहभाग आणि पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मदच्या अड्ड्यांचे आणखी पुरावे कालच पाकिस्तानने भारताकडे मागितले होते.

दहशतवादी गटांवरील कारवाईसाठी आंतररष्ट्रीय दबाव येऊ लागल्याने पाकिस्तानने “जैश’शी संबंधित 120 जणांना ताब्यात घेतले होते. “जैश ए मोहम्मद’चा म्होरक्‍या मसूद अझहरचा मुलगा आणि भावासह 44 जणांना अटकही केली गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)