जिल्हाधिकारी राम यांनी केले सन्मानित
पुणे – काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बळवंत मोरेश्वर पुरंदरे उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते गौरवपूर्वक प्रदान करण्यात आला. पुरंदरे यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.
भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा “पद्मविभूषण पुरस्कार’ यंदा बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर केला होता. दि. 11 मार्च रोजी झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यास प्रकृतीच्या कारणास्तव ते उपस्थित राहू शकते नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला. पद्मविभूषण पदक, मिनिएचर आणि सनद (प्रमाणपत्र) यावेळी पुरंदरे यांना प्रदान करण्यात आले. यावेळी तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. शासनाने स्वेच्छेने मला हा पुरस्कार दिला याचे समाधान वाटते. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील अत्यंत जिव्हाळ्याने आणि आत्मियतेने माझ्याकडे पुरस्कार सोपविला.’
– बाबासाहेब पुरंदरे, पद्मविभूषण पुरस्कराने सन्मानित.