बैरूत – यादवी युद्धात होरपळलेल्या सीरिया देशातील धुमश्चक्रीत गेल्या आठ वर्षात तब्बल 3 लाख 70 हजार लोक ठार झाले आहेत. मानवाधिकार निरीक्षण समितीच्यावतीने ही माहिती देण्यात आली आहे. ठार झालेल्यांमध्ये तब्बल 1लाख 12 हजार निरपराध नागरीक आहेत, त्यात 21 हजार लहान मुले आणि 13 हजारावर महिलांचा समावेश आहे.
15 मार्च 2011 मध्ये सीरियातील दारा शहरात सरकारच्या विरोधात अचानक मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाली. त्यानंतर हा संघर्ष निर्माण झाला. सरकार विरोधी निदर्शनांचा हा वणवा नंतर संपुर्ण देशभर पसरला. सरकारने ही निदर्शने शस्त्रांच्या बळावर मोडून काढल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात गनिमी कारवाया सुरू झाल्या. बाह्य देशांचाही येथील हस्तक्षेप वाढला आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर या देशात हवाई हल्ले करण्यात आली त्यातही अनेक जण ठार झाले आहेत. अद्यापही तेथील यादवीवर कोणताहीं तोडगा दृष्टीपथात आलेला नाही.