आरक्षणावरून विधिमंडळाच्या कामकाजाची कोंडी कायम 

विरोधकाच्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित 

गोंधळात सहा हजार कोटी रूपयांच्या पुरवण्या मागण्या मंजूर 

मुंबई: मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणाच्या अहवालावरून सुरू असलेली कामकाजाची कोंडी आजही कायम होती. मराठा आरक्षण सभागृहात मांडण्यासाठी विरोधकांनी आग्रही भूमिका घेतल्याने विधानसभा व विधानपरिषदेत प्रचंड गोंधळ उडाला. या गदारोळात विधानसभेचे पाचवेळा तर विधानपरिषदेचे कामकाज दोनदा तहकुब करण्यात आले. त्यानंतरही विरोधकांनी वेलमध्ये येऊन सरकारविरोधी घोषणाबाजी करीत जोरदार हंगामा केला. सभागृहात अभूतपूर्व गोंधळामुळे अखेर दोन्ही सभागृहे दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली. दरम्यान, विधानसभेत विरोधकांच्या गदारोळातच सरकारने 2018-19 वर्षातील तीन खात्यांच्या सुमारे सहा हजार कोटी रूपयांच्या मागण्या मंजूर करून घेतल्या तर पाच विधेयकांचे कामकाजही रेटून नेण्यात आले.

विधानसभेत सकाळी झालेल्या विशेष बैठकीत 3 लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. त्यानंतर नियमित कामकाज सुरू होताच सर्व कामकाज बाजूला सारून मराठा आरक्षणाचा अहवाल सभागृहात मांडा आणि दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत द्या… या गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या मागणीवर विरोधक आजही आग्रही राहिले. मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांवर सरकार दडपशाही करत आहे, त्यांना अटक करत आहे असा आरोप करीत त्यांच्यावर दडपशाही करायला ते काय अतिरेकी आहेत काय? असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. आरक्षणाबाबत सरकार चालढकलपणा करण्याचा प्रयत्न करत असून सरकारला निर्णय घेता येत नसल्याने सरकार यापासून पळ काढत आहे असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला.

सभागृहनेते चंद्रकांत पाटील हे मागील आठवड्यापासून तेच बोलत आहे आणि आजही तेच बोलत आहेत. त्यामुळे सरकारकडे आलेला मागास आयोगाचा अहवाल आणि टीसचा अहवाल सरकार पटलावर का ठेवत नाही असा संतप्त सवालही पवार यांनी केला. सभागृहामध्ये अहवाल पटलावर ठेवा, आम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. हा आमचा अधिकार आहे असे ठणकावतानाच आज मराठा समाज मुंबईत मोर्चा काढत आहेत, परंतु सरकार धरपकड करत आहे. मराठा समाज शिस्तबध्द मोर्चे काढत असताना त्यांची धरपकड का करीत आहे, असा सवालही त्यांनी केला.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खुलासा करताना “आज 26 /11 चा संवेदनशील विषय असल्याने पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना आजच्या ऐवजी उद्या मुंबईत येण्याची विनंती केली असे स्पष्टीकरण केले. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत आधीच भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे असे ते म्हणाले. मात्र विरोधकांचे समाधान होत नव्हते. चर्चा नको अहवाल द्या, अशी मागणी करत त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्याने विधानसभागृहात प्रचंड गोंधळ उडाला.

विखे पाटील-अजित पवार यांचा वेलमध्ये ठिय्या 
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळया जागेत ठिय्या देत आंदोलन केले.राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार यांनी देखील यावेळी वेलमध्ये ठिय्या दिला. चार वर्षांत पहिल्यांदाच आपल्यावर असे वेलमध्ये बसण्याची वेळ आली असल्याचे विखे पाटील म्हणाले. जोपर्यंत अहवाल मांडण्यात येत नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. अहवाल इंग्रजीत असला तरी मराठी अनुवादाची वाट न पाहता तो मांडण्यात यावा अशी मागणी अजित पवार यांनी केली. आरक्षणाबाबतचा अहवाल सभागृहात मांडला तर त्याविरोधात कोणीतरी न्यायालयात जाईल अशी भिती सरकारला का वाटते? अहवालात काही दोष आहे का? मराठा,धनगर, मुस्लिम आरक्षण सरकारने दिलेच पाहिजे. ते करताना सध्याच्या 52 टकके आरक्षणाला धक्काही लागला नाही पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयंत पाटील यांनी मांडली.

गिरीश बापट-नसीम खान यांच्यात खडाजंगी 
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मुस्मिांना आरक्षण देता येत नाही अशी भूमिका मांडल्याचे वर्तमानपत्रात छापून आले आहे. राज्य सरकारने याबाबत भूमिका सपष्ट करावी अशी मागणी यावेळी कॉंग्रेसच्या नसीम खान यांनी केली. तेव्हा संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी तुम्ही आमचे अध्यक्ष काय म्हणाले ते सांगू नका. ते या सभागृहाचे सदस्य नसल्याने नोटीस दिल्याशिवाय त्यांचे नाव तुम्ही घेउ शकत नाही.ते आणि राहुल गांधी काय करायचे ते बघून घेतील असे बापट यांनी बजावले.

दोन दिवसांत मराठा आरक्षणाचा कायदा आणणार 
मिराठा आरक्षण कायदा होणार असल्याने आता आंदोलने नको, असे आवाहन करीत मराठा आरक्षणाबाबत याच आठवड्यात कायदा करण्यात येत असून राज्यात सध्या असलेल्या 52 टक्के आरक्षणाला धक्का लागणार नाही. कायद्याच्या चौकटीत योग्य असे आरक्षण देण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)