महाराष्ट्रभर 21 ऑक्‍टोबर रोजी मानवी साखळीचे आयोजन 

मुंबई  – दिवसेंदिवस रोजगार व शिक्षणविषयक समस्या जटील बनत चालल्या आहेत. गेल्या काही वर्षात देशातील व राज्यातील शिक्षण व रोजगार विषयक प्रश्न यांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याची निवडणुक आश्वासने देणा-यांनी गेल्या चार वर्षात 8 कोटी नोकऱ्या देणे तर सोडाच, उलट नोटाबंदी आणि जीएसटी कर लादुन 1 कोटी लोकांच्या असलेल्या नोकऱ्या बरबाद केल्या. यामुळे अशा शिक्षण, रोजगार विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी सत्ताधारीवर्गाला याची जाणीव करून देण्यासाठी वाढती बेरोजगारी व शिक्षण बाजारीकरणाविरुद्ध येत्या 21 ऑक्‍टोबर रोजी महाराष्ट्रभर मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे.

साथीच्या रोगासारखी बेरोजगारी पसरत असताना शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे गरीब व मध्यम वर्गातील विद्यार्थी आणि पालक त्रस्त आहेत. याबाबत निव्वळ पोकळ घोषणाबाजी आणि जाहिरातबाजी वगळता ठोस काहीतरी करावे असे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना अजिबात वाटत नाही. किंबहुना या सरकारची धनिक धार्जिणी धोरणेच या परिस्थितीला जबाबदार आहेत. धर्मांध व जातपातवादी धुड्‌गुसे घालणे बंद करून केंद्र व राज्य सरकारने लाखो विद्यार्थी-युवकांना शिक्षण आणि रोजगार पुरविण्याची जबाबदारी पार पाडावी. याची सत्ताधारी वर्गाला जाणीव करून देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी मिळून कोणत्याही संघटनेचा अथवा पक्षाचा झेंडा अथवा बॅनर न घेता महाराष्ट्रभर मानवी साखळी आयोजित करण्यात आलेली आहे.

-Ads-

मानवी साखळी हे निषेधात्मक आंदोलन असून ते महाराष्ट्रातील ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. या अभिनव आंदोलनात त्या अनुषंगाने संबंध महाराष्ट्रात 50 मानवी साखळी संयोजन आयोजन समितीची बांधणी झाली असून शेकडो विद्यार्थी, युवक, महिला, नागरीक, शिक्षणप्रेमी, अनेक शिक्षणतज्ञ आणि साहित्यिक या मानवी साखळीमध्ये सहभागी होणार आहेत. तेव्हा सर्वांनी या अभुतपूर्व आंदोलनात प्रचंड संख्येने सहभागी व्हावे, असे अवाहन मानवी साखळी संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)