पुणे – ऍमनोरा स्कूलच्या मुख्याध्यापकांना आदेश  

विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ववत करा 
पुणे – हडपसर येथील ऍमनोरा स्कूलने पालकांनी फी भरली नाही म्हणून 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले पोस्टाने त्यांच्या घरी पाठविले होते. यावर विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शाळेची ही कृती शिक्षण हक्क कायदा 2009 मधील कलम 16 अन्वयेच्या तरतुदीचा भंग करणारी असल्याचे स्पष्ट करून त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ववत करण्याचे आदेश शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत.

ऍमनोरा स्कूलच्या या कृतीविरोधात पालकांनी गुरूवारी सकाळी शाळेसमोर आंदोलन केले. शुक्रवारी लक्ष्मी घुले, वर्षा उनवणे व इतर पालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक मिनाक्षी राऊत यांची भेट घेऊन एकत्रित स्वाक्षरीचा तक्रार अर्ज दाखल केला. राऊत यांनी पालकांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली आहे. शाळेने तातडीने या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ववत करण्याचे आदेश राऊत यांनी दिले आहेत.

ऍमनोरा स्कूलने मागील शैक्षणिक वर्षात केलेल्या शुल्कवाढीला पालकांकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे. शाळेने 2018-19 या शैक्षणिक वर्षाचे शुल्क 65 हजार रूपयांवरून 85 हजार इतके केले होते. शुल्कवाढ करताना नियमानुसार पालक शिक्षक संघाची मान्यता घेण्यात आली नाही. त्यामुळे ही शुल्कवाढ बेकायदेशीर असल्याने भरण्यास पालकांकडून नकार दिला होता. मात्र शाळा प्रशासन शुल्कवाढ करण्यावर ठाम होते. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर अचानक ऍमनोरा शाळा प्रशासनाने दोनशे पालकांच्या त्यांच्या पाल्यास शाळेतून काढून टाकल्याचे स्पष्ट करून त्यांचे दाखले घरपोच पाठवून दिले. यामुळे पालकांना मोठा धक्का बसला. पालकांकडून संतापही व्यक्त करण्यात आला.

ऍमनोरा शाळेबाबत पालकांच्या अनेक वेळा तक्रारी आल्या आहेत. या शाळेकडून शासकीय आदेशाचे पालन केले जात नाही. विद्यार्थ्यांनी फी भरली नसल्याने किंवा फी अपूर्ण असल्याचे कारण दाखवून विद्यार्थ्यांना थेट टी.सी. दिले आहेत. या विद्यार्थ्यांचे टि.सी.मागे घेऊन तात्काळ शाळेत पुन्हा प्रवेश देण्यात यावा. विद्यार्थ्यांचे निकालपत्र अडवून शैक्षणिक होणार नाही या दक्षता घ्यावी, असे राऊत यांनी आदेशात स्पष्ट नमूद केले आहे. आदेशाप्रमाणे कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याच्या सूचनाही मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

शाळेमध्ये कार्यरत असलेल्या पालक-शिक्षक संघाच्या मान्यतेनंतर दर दोन वर्षांनी 15 टक्के शुल्क वाढ शाळांना मान्यता दिली आहे. मात्र या तरतुदीचे उल्लंघन करून अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून बेकायदेशीरपणे शुल्क वाढ करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. याबाबत शाळांवर ठोस कारवाई शिक्षण विभागाकडून होत नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)