देशभरातील आम्रपाली समूहाच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

नवी दिल्ली: आम्रपाली समूहाच्या देशभरातील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले. या समूहाची 5 पंचतारांकित हॉटेल, सिनेमाघर, मॉल आणि फॅक्‍टऱ्या जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील आम्रपाली समूहाची चार कॉर्पोरेट कार्यालयेही जप्त करण्यात यावीत अशा सूचना न्यायालयाने दिल्लीच्या कर्जवसुली लवादाला दिल्या आहेत. न्यायायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी न करणाऱ्या या समूहाची ही सर्व मालमत्ता खोटेपणा आणि फसवणूक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

आम्रपालीच्या संचालकांकडे जर पैसे असतील तर घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांचे पैसे डिसेंबरपर्यंत परत करण्यात यावेत, अशी सूचनाही न्यायालयाने कंपनीच्या संचालकांना केली आहे. या परतफेडीचे 3 हजार कोटी रुपये कसे परत करणार याबाबतचे स्पष्टिकरण पुढील आठवड्यापर्यंत देण्याची सूचनाही न्यायालयाने केली आहे.

-Ads-

आम्रपाली समूहाच्या 2015-16 सालच्या व्यवहाराच्या फॉरेन्सिक ऑडिटची माहिती सादर न केल्याबद्दल न्यायालयाने समूहाची कानउघाडणी केली. नऊ वेळा आदेश देऊनही समूहाकडून व्यवसायिक व्यवहारांची निश्‍चित स्वरुपाची माहिती दिलेली नाही. हा शुद्ध खोटेपणा आहे, असे न्यायालयाने सुनावले. आम्रपाली समूहाचे मुख्य कार्यकारी संचालक अनिल शर्मा आणि अन्य संचालकांच्याविरोधात विश्‍वासघाताचा गुन्हेगारी स्वरुपाचा खटला का चालवू नये ? अशी विचारणाही न्या. अरुण मिश्रा आणि न्या. यु.यु. ललित यांनी केली आहे.
चौकट

ही मालमत्ता होणार जप्त
ग्रेटर नोएडामधील आम्रपाली हॉलिडे इन टेक पार्क हे पंचतारांकित हॉटेल, बिहारमधील राजगीर आणि बक्‍सार जिल्ह्यातील आम्रपाली बायोटेक आणि मम्स ही कंपनी, मुझफ्फरपूर, बरेली आणि गया जिल्ह्यातील आम्रपालीचे मॉल, मीरतमधील हायटेक सिटी सिनेमाघर, ग्रेटर नोएडामधील आम्रपाली प्राकास्ट फॅक्‍टरी, पुर्णिया आणि भुवनेश्‍वरमधील जमीन आणि गोव्यातील व्हिला जप्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याशिवाय ग्राहकांच्या पैशातून खरेदी केलेल्या आलिशान कारही जप्त करण्याचे आदेश आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)