पुणे – लष्करासाठी शस्त्रास्त्र आणि दारूगोळा निर्मिती करणाऱ्या दारूगोळा निर्मिती कारखाने (ऍम्युनिशन फॅक्टरी) यांचे सामुदायिकीकरण करण्याबाबत विविध दारूगोळानिर्मिती कामगार संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या सामुदायिकीकरणाला विरोध करत हा निर्णय संरक्षण मंत्रालयाने मागे घ्यावा, अन्यथा दारूगोळानिर्मिती कामगारांतर्फे राष्ट्रीय बंद पुकारण्यात येईल, असा इशारा विविध कामगार संघटनांनी दिला आहे.
भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रनिर्मितीला चालना मिळावी, यासाठी संरक्षण मंत्रालयातर्फे “मेक इन इंडिया’अंतर्गत खासगी कंपन्यांनादेखील शस्त्रास्त्रनिर्मितीत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मंत्रालयातर्फे खासगी कंपन्यांना विविध सवलतीदेखील देण्यात आल्या आहेत. मात्र, मंत्रालयातर्फे घेण्यात आलेला हा निर्णय कामगार संघटना आणि संस्थांना विश्वासात न घेता जाहीर करण्यात आला असून देशभरातील सर्वच 41 दारूगोळानिर्मिती कारखान्यांमधील कामगार संघटनांकडून या सामुदायिकीकरणाला विरोध करण्यात येत आहे. यामध्ये ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉयी फेडरेशन, इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशन आणि भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ या संघटनांचा समावेश आहे.
कारखान्यांच्या सामुदायिकीकरणामुळे कामगारांच्या रोजगारावर परिणाम होण्याबरोबरच देशाच्या सुरक्षेलाही धोका पोहोचेल. त्यामुळेच सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अथवा संघटनांतर्फे अनिश्चित कालावधीसाठी राष्ट्रीय बंद पुकारण्यात येईल, असा इशारा भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे सचिव मुकेश सिंग यांनी दिला आहे.