डोनेशन घेणाऱ्या शाळांवर कारवाईचा अहवाल दोन दिवसांत द्या, अन्यथा शिक्षण उपसंचालक कार्यालयास टाळे ठोकू : आमदार राजेश क्षीरसागर यांचा इशारा
कोल्हापूर: दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय आणि महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेस सुरवात झाली असून, डोनेशन, बांधकाम फी, शालेय साहित्य या माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांची लुट शिक्षण सम्राटांच्या कडून होत आहे. यावर शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे कोणतेही नियंत्रण नसून, शिक्षण सम्राटांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. दरवेळी शिवसेनेने आंदोलन केले कि शिक्षण उपसंचालक कार्यालयास जाग येते.
गेल्या दोन वर्षात पालकांची लुट करणाऱ्या शाळा बंद करा, अशी मागणी युवासेनेने केली आहे. यावर कोणती कार्यवाही करण्यात आली याचा अहवाल येत्या दोन दिवसात द्या, अन्यथा अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही. शिक्षण उपसंचालक कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा देत आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
शिक्षण संस्थाच्या चाललेल्या मनमानी कारभारा विरोधात शिवसेना व युवासेनेच्या वतीने आज शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी “जय भवानी जय शिवाजी”, शिक्षण सम्राटांचा व शिक्षण खात्याच्या भ्रष्टाचारी कारभार विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. मोर्च्याच्या अग्रभागी शिक्षण सम्राटांचा राक्षस पालक व विध्यार्थाच्या गळ्यावर सुरी ठेऊन लुट करीत असल्याचा देखावा सादर करण्यात आला.