विरोधी पक्षनेत्यांचा सोमवारी राजीनामा

अजित पवारांशी चर्चा करून घेणार निर्णय – साने

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना आपण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढाई उभी केली. माझा कालावधी संपला असला तरी विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत आपल्याला कालावधी वाढवून द्यावा, अशी आपली इच्छा असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दोन दिवसांत याबाबत चर्चा करणार असून त्यांनी आदेश दिल्यास आपण सोमवारी राजीनामा देणार असल्याची माहिती दत्ता साने यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेता बदलण्याच्या हालचाली राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुरू आहेत. दत्ता साने यांचा गेल्या माहिन्यात कालावधी संपुष्टात आल्याने या पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, जावेद शेख आणि नगरसेविका वैशाली घोडेकर हे तिघेजण स्पर्धेत आहेत. साने यांच्या जागी नियुक्तीसाठी इच्छुकांची हालचाली सुरू केल्या असल्या तरी आपणाला कालावधी वाढवून द्यावा, यावर दत्ता साने ठाम आहेत. त्यातच ते गेली आठ ते दहा दिवस खासगी परदेश दौऱ्यावर असल्याने हा मुद्दा “थंड बस्त्यात’ होता. काल (गुरुवारी) साने परतल्याने विरोधी पक्षनेता बदलाच्या मुद्‌द्‌याने पुन्हा उचल खाल्ली आहे.

याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, आपण विरोधी पक्षनेता म्हणून चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असल्यामुळे दोन महिन्यांची मुदतवाढ मिळावी यासाठी मी वरिष्ठांशी बोललो असून दोन दिवसांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाणार असून “दादां’नी आदेश दिल्यास आपण तात्काळ राजीनामा देणार असल्याचे साने म्हणाले. त्यामुळे साने यांना मुदतवाढ मिळणार की नवा पक्षनेता शहराला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इच्छुकांची घाई?

विरोधी पक्षनेतेपदासाठी नाना काटे आणि जावेद शेख यांनी जोरदार तयारी चालविली आहे. लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि आपणाला संधी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. त्यातच या पदाच्या घडामोडीमागे विधानसभेची गणिते असल्याने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)