कॉंग्रेसचा बालेकिल्ला सोलापूर लोकसभेवर विरोधकांचा सिक्‍सर

सोलापूर मतदार संघावर आतापर्यंत 17 पैकी 11 वेळा कॉंग्रेस पक्षाची विजयी पताका

सोलापूर (सूर्यकांत आसबे) – सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 1952 ते 2014 या काळातील 17 निवडणुकांचा लेखाजोखा घेतला असता 17 पैकी 11 वेळा कॉंग्रेसने बाजी मारली तर सहावेळा कॉंग्रेस विरोधकांनी आपला झेंडा रोवत सिक्‍सर मारला आहे. . सध्या या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असून ही जागा कायम राखण्यासाठी भाजपला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. दुसरीकडे भाजपच्या ताब्यातील ही जागा खेचून घेण्यासाठी कॉंग्रेसने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. 2004 पर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा सर्वसाधारण होता. मतदारसंघ पुनर्रचनेत 2009 पासून हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून सोलापूरवर कॉंग्रेसच्या विचारांचा पायंडा आहे. काही अपवाद वगळता तेव्हापासून कॉंग्रेसचे संघटनही मजबूत राहिलेले आहे. पण प्रजासत्ताक भारतातील 1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या यशाचा गवगवा सुरू असताना सोलापुरात मात्र शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्यसेनाची तुळशीदास जाधव यांनी कॉंग्रेसला सळो की पळो करून सोडले होते. यावेळी सोलापूर मतदारसंघातून शेकापचे शंकरराव मोरे यांनी कॉंग्रेसचे उमेदवार स्वातंत्र्यसेनानी डॉ. कृ. भि. अंत्रोळीकर यांचा पराभव करून विजयश्री खेचून आणली होती.

1957 मध्ये शेकापबरोबरच कॉंग्रेसलाही हार मानावी लागली. यावेळी शेकापला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले स्वातंत्र्यसेनानी तुळशीदास जाधव यांना अटीतटीच्या सामन्यात संयुक्त महाराष्ट्र समितीचे बाळासाहेब मोरे यांच्याकडून हार पत्करावी लागली होती.

पहिल्या दोन निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाल्यानंतर 1962 मध्ये कॉंग्रेसने श्री सिध्देश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. त्यावेळी अप्पासाहेब काडादी यांनी हिंदू महासभेचे वि. रा. पाटील व अपक्ष उमेदवार कामगार नेते आबासाहेब किल्लेदार यांना पराभवाची धूळ चारत प्रथमच ही जागा कॉंग्रेसला मिळवून दिली. तेव्हापासून 1991 पर्यंत सलग आठ वर्षे कॉंग्रेसचा वरचष्मा राहिला.1967 मध्ये सूरजरतन दमाणी यांनी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांनी अपक्ष शंकरप्पा धनशेट्टी व छन्नुसिंह चंदेले यांचा पराभव करून विजय मिळविला. पुन्हा 1971 ते 1977 असे सलग तीनवेळा सुरजरतन दमाणी यांनी विजयाची पताका सुरूच ठेवली.

1980 मध्ये मुदतपूर्व निवडणुका झाल्या. यावेळी कॉंग्रेसचे गंगाधरपंत कुचन यांनी तत्कालीन जनता पक्षाचे भाई पन्नालाल सुराणा यांना पराभूत केले. 1984 मध्येही पुन्हा गंगाधरपंत कुचन यांनीच बाजी मारली.1989 मध्ये तत्कालीन महापौर धर्मण्णा सादूल यांना उमेदवारी देऊन कॉंग्रेसने त्यांना निवडून आणले. यावेळी भाजपचे लिंगराज वल्याळ यांना त्यांनी पराभूत केले होते . 1991 च्या मुदतपूर्व निवडणुकीत धर्मण्णा सादूल यांनी पुन्हा विजय मिळविला. यावेळी भाजपचे गोपीकिसन भुतडा यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 1996 मध्ये मात्र धर्मण्णा सादूल यांना हॅट्ट्रिक साधता आली नाही. इंडीचे माजी आमदार व जनता दलाचे उमेदवार रविकांत पाटील हे धर्मण्णा सादूल यांच्या तिसर्या वेळच्या विजयाला अडसर ठरले. रविकांत पाटील यांनी कॉंग्रेसची मते खेचल्याने या मतविभागणीचा भाजपचे उमेदवार लिंगराज वल्याळ यांना फायदा झाला. लिंगराज वल्याळ यांनी 17 हजारांचे मताधिक्‍य घेऊन विजयश्री मिळवीत सर्वांनाच धक्का दिला. यावेळी रविकांत पाटील दुसर्या स्थानी तर विद्यमान खासदार असतानाही धर्मण्णा सादूल तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले .

1998 मध्ये पुन्हा मुदतपूर्व निवडणुका झाल्या. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे राज्यसभेवर सदस्य होते. सुशीलकुमार शिंदे यांची मुदत असून शिल्लक असताना कॉंग्रेसने त्यांना सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी दिली. या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या ताब्यात गेलेली जागा पुन्हा कॉंग्रेसला मिळवून दिली. सुशीलकुमार शिंदे यांनी एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्‍य घेत भाजपचे लिंगराज वल्याळ यांना पराभूत केले.

1999 मध्ये पुन्हा मुदतपूर्व निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांनी बाजी मारत लिंगराज वल्याळ यांना दुसर्यांदा पराभूत केले. दरम्यान, 2003 मध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आली. त्यामुळे त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला. यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांना निवडणूक रणांगणात उतरविले. कॉंग्रेसने माजी दुग्धविकासमंत्री आनंदराव देवकते यांच्या गळ्यात उमेदवारी घातली. यावेळी सत्ताधारी कॉंग्रेसच्या मंडळींनी उघडपणे भाजपचे उमेदवार प्रतापसिंहांचा प्रचार करून त्यांना निवडून आणले. ही निवडणूक लक्षवेधी ठरली होती. नंतर वर्षभरातच प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेसशी घरोबा केला. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीत भाजपने सुभाष देशमुख यांना उमेदवारी दिली.

कॉंग्रेसकडून तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वलाताई शिंदे यांनी पदर खोचला. सर गोष्टींचा वापर केला मात्र उज्ज्वलाताईंना अनपेक्षितपणे धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले . . मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा पराभव झाल्याची चर्चा संपूर्ण देशभरात झाली होती. याशिवाय पुढे अनेक वर्षे या पराभवाचे शल्य कॉंग्रेसजनांना बोचत राहिले. आजही पराभवाचे शल्य शिंदे समर्थक विसरलेले नाहीत.

दरम्यान 2009 ला सोलापूर मतदारसंघ राखीव झाला. कॉंग्रेसने पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदे यांना उतरविले. त्यांनी भाजपचे नवखे उमेदवार ऍड. शरद बनसोडे यांचा लाखाच्या मताधिक्क्‌यांनी पराभव करीत ही जागा पुन्हा मिळविली. 2014 मध्ये पुन्हा सुशीलकुमार शिंदे व ऍड. शरद बनसोडे यांच्यातच लढत झाली. त्यावेळी मोदी लाटेत ऍड. बनसोडे अनपेक्षितपणे विजयी झाले. दीड लाखाच्या आसपास मते मिळवीत त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला. संपूर्ण देशभरात असलेल्या मोदी लाटेचा फटका सुशीलकुमारांनाही बसला. यावेळी शरद बनसोडे यांच्या विजयापेक्षा सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवामुळे अनेकांना दुःख झाले होते.

सोलापूरच्या विजयाचे शिलेदार

1952-शंकरराव मोरे (शेकाप)
1957-बाळासाहेब मोरे (संयुक्त महाराष्ट्र समिती)
1962-अप्पासाहेब काडादी (कॉंग्रेस)
1967-सूरजरतन दमाणी (कॉंग्रेस)
1971-सूरजरतन दमाणी (कॉंग्रेस)
1977-सूरजरतन दमाणी (कॉंग्रेस)
1980-गंगाधरपंत कुचन (कॉंग्रेस)
1984-गंगाधरपंत कुचन (कॉंग्रेस)
1989-धर्मण्णा सादूल (कॉंग्रेस)
1991-धर्मण्णा सादूल (कॉंग्रेस)
1996-लिंगराज वल्याळ (भाजप)
1998-सुशीलकुमार शिंदे (कॉंग्रेस)
1999-सुशीलकुमार शिंदे (कॉंग्रेस)
2003-प्रतापसिंह मोहिते- पाटील (भाजप पोटनिवडणूक)
2004-सुभाष देशमुख ( भाजप)
2009-सुशीलकुमार शिंदे (कॉंग्रेस)
2014-ऍड. शरद बनसोडे (भाजप)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)