मांडवगण गटात दुसऱ्यांदा लोकसभा उमेदवारीची संधी

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्‍याला अद्याप खासदारकी लाभली नसली तरी, तालुक्‍यातील मांडवगण जिल्हा परिषद गटात मात्र दुसऱ्यादा खासदारकीची उमेदवारी मिळाली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा श्रीगोंदा तालुक्‍यातील खासदार होणार का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून आमदार संग्राम जगताप यांचे नाव निश्‍चित झाल्यानंतर मांडवगण जिल्हा परिषद गटासह श्रीगोंदा तालुक्‍यातील अनेकांना याचे अप्रूप वाटले. आमदार जगताप हे नगरमध्ये स्थायिक असले, तरी त्यांचे मूळ गाव श्रीगोंदा तालुक्‍यातील बनपिंप्री हे आहे. मांडवगण जिल्हा परिषद गट त्यांचा बालेकिल्ला. आमदार राहुल जगताप, आमदार संग्राम जगताप व आमदार अरुण काका जगताप अशा तीन आमदारांचा श्रीगोंद्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आहे, आता खासदारकीची संधी जगताप यांच्याच घरात गेली आहे.

तत्पूर्वी 1999 ला याच गटातील बाबासाहेब भोस यांना कॉंग्रेस ने लोकसभेची उमेदवारी दिली होती. तिरंगी लढतीत दिलीप गांधी (भाजप) यांनी बाजी मारली. श्रीगोंदा तालुक्‍यातून लोकसभा निवडणूक लढविणारे आणखी एक उमेदवार होते, ऍड. संभाजीराव बोरुडे. 1989 साली त्यांना बहुजन समाज पक्षाने तिकीट दिले होते. मात्र त्यांचा फारसा प्रभाव पडला नव्हता. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी उमेदवारांची जी चाचपणी सुरू झाली होती, त्यात श्रीगोंदा तालुक्‍यातील नावांची चर्चा अधिक होत होती. जिल्हा परिषदेच्या सभापती अनुराधा नागवडे यांचे नाव राष्ट्रवादीकडून अनेकदा चर्चिले गेले. तत्पूर्वी शिवसेनेने स्वतंत्र लढण्याची तयारी केली, तेंव्हा घनश्‍याम शेलार यांचे नाव जवळपास जाहीर झाले होते. पुढे युती झाली अन्‌ शेलारांची 1999 नंतर दुसऱ्यादा संधी हुकली. भाजपच्या गोटातून उमेदवारांची शोध मोहीम सुरू असताना, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडे विचारणा झाली होती. त्यांनी ही ऑफर अमान्य केली.

बाबासाहेब भोस यांच्यापुढे धर्मसंकट…

आ. जगताप यांच्या उमेदवारीमुळे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्यापुढे मात्र धर्मसंकट उभे ठाकले आहे. जगताप कुटुंबीय व भोस यांचे जुने हाडवैर सर्वश्रुत आहे. बलभीम जगताप यांना जिल्हा परिषद निवडणुकीत भोस यांनी 1980 ला पराभूत केले होते. पुढे राजकीय वाद शत्रुत्वात बदलला. भोस यांचा पाडाव सचिन जगताप यांनी करून परतफेड केली. जिल्हा परिषदेच्या मागील निवडणुकीत भोस यांच्या सून गौरी गणेश यांचा निसटता पराभव सुवर्णा सचिन जगताप यांनी केला. आता जगताप व भोस दोघे एकाच पक्षात आहेत. दोघांचे मूळ गाव शेजारीच आहेत. मागील संदर्भ विचारात घेता भोस हे जगताप यांच्यासाठी उघडपणे प्रचार करतील की कसे ? याबाबत राजकिय वर्तुळात उत्सुकता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)