उरमोडीच्या पात्रात खुलेआम वाळुची चोरी

महसूल विभागाचा लाखोंचा महसूल बुडीत
प्रशासनाचे “सोयीस्कर दुर्लक्ष’

नितीन साळुंखे

एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळूमाफीये उरमोडी नदीतून अवैधरित्या वाळू उपसत असतानाच अपशिंगे मंडलाधिकारी व तलाठी यांचे याकडे लक्ष नसल्याने येथील जनतेतून आश्‍चर्य व्यक्त होत आहे.त्यांच्याकडून घेण्यात येत असलेल्या गांधारीच्या भूमिकेमुळे यामागचे नक्की गौडबंगाल काय? या वाळूमाफियांवर राजकीय वरदहस्त असल्याची चर्चाही या परिसरात सुरू असून त्यामुळेच त्यांच्यावर कारवाईही होत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आत्तापर्यंत शासनाच्या लाखो रुपयांचा रॉयल्टीला या माफियांनी महसुलच्याच मदतीने चुनाच लावला असल्याची खुमासदार चर्चा असून आता महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच अपशिंगे मंडलातील कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडा-झडती घ्यावी व या वाळूमाफियांच्या तातडीने मुसक्‍या आवळून उरमोडी नदी या माफियांच्या तावडीतून सोडवावी अशी मागणी येथील जनतेतून होत आहे.

नागठाणे – सातारा जिल्ह्यात वाळू उपश्‍यावर बंदी लादल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. अधिकृत वाळू लिलाव बंद असल्याने हे वाळूमाफीये चोरून वाळू काढण्यात प्रयत्नांची पराकाष्ठा करत असून त्याकरिता वाळु उपसण्यासाठी नवनवीन जागांचा शोध घेत आहेत. त्यातच आता या वाळूमाफियांची वक्रदृष्टी सातारा तालुक्‍यातून वाहणाऱ्या उरमोडी नदीच्या पात्रावर पडली असून माजगाव-मत्त्यापुर दरम्यानच्या या नदीपात्रात वाळूमाफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. येथून खुलेआम जेसबीच्या साहाय्याने वाळू उपसली जात असतानाच महसूल विभागाच्या अपशिंगे मंडलातील कर्मचाऱ्यांकडून मात्र या घटनेकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली जात आहे. यामुळे महसूल विभागाला लाखो रुपयांच्या रॉयल्टीला मात्र मुकावे लागले आहे.

हरित लवादाने जिल्ह्यात वाळूउपश्‍यावर बंदी घातल्याने जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना करून अवैध वाळूउपश्‍याविरोधात कारवाया केल्या. त्यामूळे बांधकाम क्षेत्रात वाळूची टंचाई निर्माण झाली आहे. याचाच फायदा घेत वाळूमाफीये अवैधरित्या वाळू काढण्यासाठी नव-नवीन जागा शोधत आहेत. त्यामुळे सध्या त्यांची नजर सातारा तालुक्‍यातून वाहणाऱ्या उरमोडी नदीपात्रावर पडली आहे.

सध्या वाळूमाफियांकडून माजगाव, अतीत ते मत्त्यापुर दरम्यान अतीत येथील बंधाऱ्यादरम्यान वाहणाऱ्या उरमोडी नदीच्या पात्रातून बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. पहाटे लवकर अथवा रात्री उशिरा येथे अनेक ठिकाणी जेसबीच्या साहाय्याने वाळूचे ट्रॅक्‍टर बाहेर काढले जात आहेत. पुढे हीच वाळू ट्रकच्या साहाय्याने आंबेवाडी मार्गे बोरगाव-नांदगाव रस्त्याने इतरत्र पाठवली जात असल्याचेही समजते. गेल्या काही दिवसांपासून या भागात वाळूमाफियांनी उच्छाद मांडला असून या ठिकाणी वाळूचा मुबलक साठाही असल्याने त्यांचे उखळ पांढरे होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)