चर्चा: प्रिय मतदार बाळास खुले पत्र

मुकुंद परदेशी

कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या की, सर्वात प्रथम प्रत्येकालाच आठवण येते ती मतदारांची. एरव्ही दुर्लक्षित असलेला, म्हणजे निवडणुकांच्या निकालानंतर त्वरित अडगळीत पडणारा हा सामान्य माणूस, मग पुन्हा एकदा “दीड महिन्यांसाठीचा राजा’ बनतो. या राजाने मतदान यंत्रावरील आपल्या नावासमोरीलच निळे बटन दाबावे, म्हणून या 15 सेकंदांच्या कृतीसाठी उमेदवार काय काय करतात, हे पाहिले की, “ही कसली लोकशाही’ असा प्रश्‍न पडल्यावाचून राहात नाही. म्हणून अशा कथित मतदार राजासाठी काही “युक्‍तीच्या गोष्टी…’

प्रिय मतदार बाळा,
अरे, रागावू नकोस तुला बाळ म्हटलं म्हणून. या राजकारण्यांनी तुला “राजा राजा’ म्हणून तुझी दिशाभूल करून ठेवलेली आहे. जिथे या देशाचा पंतप्रधानच फकीर आहे, तिथे तू कसा काय राजा असू शकतोस? चांगला 72 वर्षांचा झालास तरी अजून तुझी बालबुद्धी काही प्रगल्भ झालेली नाही. आपले राजकारणी बघ, गेल्या 72 वर्षात ते आपली निरागसता त्यागून प्रगल्भ झाले आणि अल्पकाळातच सराईतही झाले! आता बघ निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. “प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य असते,’ असे पूर्वी म्हणत असत. आता त्यात राजकारणाची भर पडली आहे. कोणावर विश्‍वास ठेवायचा, कोणावर नाही हे तुझे तूच ठरव रे बाबा. मला तर निवडणूक सभेतले कोणाचेही भाषण ऐकताना मागून सतत, “गोलमाल है भाई, सब गोलमाल है…’ हेच गाणे ऐकायला येते! एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाला दाखवावे म्हणतो. मला नाही रे, त्या भाषण करणाऱ्यांना!

हे बघ बाळा, पूर्वी गावावरून ओवाळून टाकलेली रत्नं राजकारणात जातात, असा समज होता. आता मात्र काळ बदलला आहे. आता अंतर्ज्ञानी, अंतर्दृष्टी लाभलेले, अभिनयात मुरलेले अनेक संत-सज्जन राजकारणात सापडतात.(जसे अनेक अभियंते बॅंकांमध्ये नोकरी करताना सापडतात अगदी तसेच!) आता बघ ना, आपले (?) “इंजिनवाले नेते’ म्हणजे किती “राज’बिंडं व्यक्‍तिमत्त्व, किती धारदार आवाज. पण आपल्या मुख्यमंत्र्यांना ते चक्‍क पोपट वाटले आणि त्यांचं भाषण म्हणजे पोपटपंची म्हणे! वर या पोपटपंची करणाऱ्या पोपटाची “मती’ “बारा’ गावचं पाणी पिऊन बिघडलेली आहे, हेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या आंतर्दृष्टीने ओळखले! हे इंजिनवाले “सुपारी’ घेतात म्हणे. अरेरे, एखाद्याचे किती अवमूल्यन करावे याला काही सीमा असावी की नको? आता कोणते नेते “काय घेतात’ हे एक उघड गुपित असताना मुख्यमंत्र्यांनी असले वक्‍तव्य करावे, याला काय म्हणावे. मला तर “कृष्ण निवास’च्या बाहेर कुठे “सुपारी खरेदी केंद्र’ दिसले नाही. कदाचित गुप्तवार्ता विभागाने मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे गुप्तपणे चालणाऱ्या धंद्याची माहिती दिली असावी.

हे बघ बाळा, या राजकारण्यांच्या अंतर्ज्ञानाचा, अंतर्दृष्टीचा उपयोग त्यांना फक्‍त विरोधकांना ओळखण्यासाठीच होत असतो. आपल्याच पक्षात कुठे बंडाचे वारे वाहत आहेत, कोण गद्दारी करणार आहे, हे ओळखण्यासाठी यांना या सिद्धी वापरता येत नाहीत. आता बघ ना, इकडे इंजिनवाले नेते पंतप्रधान-पक्षाध्यक्ष जोडगोळीवर आपला (सदैव तयार असलेला) तोफखाना चालवत असताना तिकडे त्यांचे एक आणि एकमेव सरदार शत्रूपक्षाच्या छावणीत दाखल झाले. शत्रू पक्षानेही त्यांना, “पदरी पडले पवित्र झाले !’ या उक्‍तीप्रमाणे मोठ्या मनाने पदरात घेतले. आता पक्ष बदलूनही या सरदारांची आमदारकी काही जाणार नाही. त्यांनी पक्षांतरबंदी कायदा कुठे मोडला? इथे तर 100% पक्षांतर झालं आहे. एकच तर होता आणि एकच तर गेला! नाही तरी “शरदाची माणसं’ असतातच चतूर आणि कावेबाजही!
अरे हो बाळा, आता या विषयावरून मला एकदम आपले (?) “बारामतीकर काका’ “आठवले’त बघ. नावच असं असलं म्हणजे मग रातोरात टोपी बदलणे, बोलावे एक आणि करावे दुसरेच या कला उपजतच अवगत होत असाव्यात, असे वाटते.

आपल्या या काकांचा “पुलोद’चा प्रयोग आठवतो का? कुणाच्यातरी विदेशीपणाला विरोध म्हणून स्वत:चा “राष्ट्रीय पक्ष’ जन्माला घालणे, आणि परत तोच पक्ष घेऊन उभा दावा घेतलेल्यांशीच आघाडी करणे हे म्हणजे टोपीचा कबुतर करणे आणि परत कबुतराची टोपी करण्यासारखे आहे. ते या महनीय काकांनाच जमू शकते! “खास लोकाग्रहास्तव’ माणदेशातून आपली उमेदवारी जाहीर करणे आणि “खास कुटुंबाग्रहास्तव’ ती मागे घेणे हेसुद्धा फक्‍त आणि फक्त थोरल्या काकांनाच जमू शकते. मी एकाला सहजचं विचारलं की, हे काका इतके मुलायम कसे झालेत? तर तो नतद्रष्ट (भाजपचाच असणार नक्‍की!) म्हणतो कसा, “अरे, ते काका राहिले नाहीत आता, आजोबा झाले आहेत.

अरे हो बाळा, तुला “माफीचा साक्षीदार’ हा प्रकार माहीत आहे का रे? माझा पूर्वी असा समज होता की, माफीचा साक्षीदार हा एखाद्या गुन्ह्यात चुकून सामील झालेला पण नंतर उपरती झालेला एखादा हळव्या मनाचा माणूस असतो; पण आता कळतंय की, “माफीचा साक्षीदार’ हा सत्ताधारी पक्षाचाच एखादा आमदारच काय, मंत्रीसुद्धा असू शकतो. सध्या आमच्या (?) “रोडकरी’ साहेबांना अशीच उपरती झालेली दिसते. “सर्व राजकारणी हे लबाड, खोटारडे आणि नाटकी असतात,’ असे स्पष्टपणे सांगण्याऐवजी ते, “सर्व राजकारणी हे उत्तम अभिनेते असतात,’ अशी शर्करागुंठीत “नागपुरी वटी’ देतात. आपल्याच सहकाऱ्यांची बौद्धिक पातळी सांगण्यासाठी ते, “प्रथम वर्गात उत्तीर्ण होणारा अधिकारी होतो तर चारदा नापास होणारा मंत्री होतो!’ अशी भाषा वापरतात. मग एखाद्या नतद्रष्टाने, “मग पंतप्रधान कोण होतो?’ असा प्रश्‍न “रोडकरी’ मंत्र्यांना विचारला तर?

जाऊच दे बाळा, हे म्हणजे कोळसा उगाळवा तितका काळाच, असे आहे. तू शांतपणे सर्व पाहात रहा, ऐकत राहा आणि शेवटी मतदान करताना तुझ्या बालबुद्धीला पटेल तसा निर्णय घे. फार तर काय नंतर पश्‍चाताप करावा लागेल आणि अशी पश्‍चाताप करावा लागण्याची काय तुझी पहिली वेळ आहे का? सांभाळ.

तुझाच हितचिंतक
स. दा. आगलावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)