साताऱ्यात एकच चर्चा, खासदार होणार कोण?

गावच्या पारावर रंगतोय गप्पांचा फड: रात्री ही पेटतायत राजकीय शेकोट्या

सम्राट गायकवाड 

सातारा – दिवाळीचा सण संपला असला तरी येत्या काही महिन्यांमध्ये येवू घातलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय फटाके वाजण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीनंतर नुकतीच कॉंग्रेसची मुंबईत झालेली बैठक, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा पुण्यातील वाढता वावर, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांचे माढ्यातील वाढते दौरे अन त्या पार्श्‍वभूमीर आ.गोरेंसह सर्वपक्षीय नेत्यांची झालेली बैठक आणि कुस्ती लीगच्या माध्यमातून पुरूषोत्तम जाधव यांची पवारांशी वाढती जवळीक यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे साहजिकच सध्या जिल्ह्यात साताऱ्यासह, माढा आणि चक्क पुण्यातून खासदार होणार कोण, याबाबत गावच्या पारावर अन रात्रीच्या शेकोट्यांमध्ये चर्चा रंगताना दिसून येतेय.

सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि खासदार उदयनराजेंचा मतदारसंघ म्हणून राज्यात सुपरिचित आहे. राष्ट्रवादीने आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर दिवाळीपुर्वीच मुंबईत बैठकीचे आयोजन करून चाचपणी करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले. त्या बैठकीत उशिरा का होईना खा.उदयनराजे पोहचले व अप्रत्यक्ष राष्ट्रवादीकडूनच खासदारकी लढविण्याचे संकेत दिले. त्यानंतर आलेल्या दिवाळीच्या सणामुळे राजकीय हालचाली मंदावल्या होत्या. परंतु दिवाळीच्या दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघातील अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी मागील निवडणूकीप्रमाणे यंदाही आ.जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने टेंभुर्णीत बैठक झाली.

बैठकीला सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, रणजितसिंह ना.निंबाळकर, उत्तमराव जानकर यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. साहजिकच बैठकीचे वृत्त सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण-खटाव विधानसभा मतदारसंघात पोहचताच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना चर्चेसाठी आयता विषय मिळाला. त्यामागील कारण म्हणजे, माढा लोकसभेसाठी माण तालुक्‍यातील माजी आयुक्त प्रभाकर देशमुख व फलटण तालुक्‍यातून संजीवराजे ना.निंबाळकर यांच्या ही नावाची चर्चा अगोदर पासूनच होत होती. अशावेळी टेंभुर्णीतील बैठकीमुळे फलटण अन माण तालुक्‍यात ऐन थंडीत होणाऱ्या चर्चांनी राजकीय वातावरण अत्तापासून गरम होण्यास सुरूवात झाली.

त्या पाठोपाठ नुकतीच खा.शरद पवार व माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या संयुक्त मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आले. साहजिकच मुलाखत पुण्यात होत असली तरी सातारा जिल्ह्यातील खा.उदयनराजे समर्थंकांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण होते. त्याच बरोबर मुलाखतीपासूनच कॉंग्रेसच्या वाट्याला असलेला पुणे लोकसभा मतदारसंघ श्रीनिवास पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीला सोडण्यात येणार असल्याची हवा ही सोडण्यात आली. मात्र, पुणेच्या बदल्यात कॉंग्रेस सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा करणार असल्याची प्रतिहवा विरोधकांनी सोडली.

त्यात भर म्हणून की काय, नुकतीच मुंबई येथे कॉंग्रेसची लोकसभेसाठी बैठक पार पडली. त्या बैठकीत कॉंग्रेसने साताऱ्यावर दावा केला अन केवळ दावा करण्यावर मर्यादित न राहता कॉंग्रेसकडून खा.उदयनराजे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीची मागणी ही करून टाकली. साहजिकच एवढ्या मोठ्या घडामोडींमुळे वेळ जाईना म्हणून चकाट्या पिटत बसणाऱ्यांना चर्चांना आयताच विषय मिळाला असल्याचे ठीकठीकाणी दिसून येत आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या एका बाजूला बैठका सुरू असताना, दुसऱ्या बाजूला दोन वेळा सातारा लोकसभा निवडणूक लढविलेले पुरूषोत्तम जाधव यांनी मात्र यंदा साताऱ्याचे मैदान मारायचे या निर्धाराने कुस्ती लीग मधील टीम घेतली. एवढेच नव्हे तर टिमला यशवंत सातारा असे नाव ही दिले आणि आणखी पुढची गोष्ट म्हणजे यशवंत साताराच्या सामन्यांना चक्क खा.शरद पवारांनी उपस्थिती लावली. सामन्या दरम्यान जाधव व पवारांचा झालेला संवादाची छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाली अन साताऱ्याच्या राष्ट्रवादीत आणि खा.उदयनराजे गटात ट्विस्ट निर्माण झाला. परिणामी यंदा पुरूषोत्तम जाधव यांना राष्ट्रवादीची उमेदवारी अशी आरोळी ही ठोकण्यात आली असून पवारांना नवा पैलवान सापडला या चर्चांना जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात उधाण येण्यास सुरूवात झाली.

काका खासदार की राज्यपाल होणार ?
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपचे अतुल भोसले यांचा प्रभाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना मागेच सुरूवात झाली आहे. मात्र, त्यामध्ये अधिक भर म्हणूण की काय, सातारा लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसच्या वाट्याला आला तर विलासराव पाटील- उंडाळकरांना दिल्लीत पाठविण्यासाठी बाबा गटाकडून प्रयत्न केले जाणार अशी एका बाजूला हवा सोडण्यात आली असून त्या हवेला प्रतिउत्तर म्हणून भाजप विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी राज्यपाल करणार असल्याची अशी ही हवा सोडून देण्यात आली.

रणजितदादा उतरणार का मैदानात ?
माढा लोकसभा मतदारसंघासाठी यंदाही आ.जयकुमार गोरे यांच्यासह रणजितसिंह ना.निंबाळकर, संजय मामा शिंदे यांची संयुक्त बैठक झाली. परंतु अशी बैठक मागील निवडणूकीपुर्वी ही झाली होती त्या बैठकीतून राजकीय यश प्राप्त होवू शकले नव्हते. त्यामागे मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण असल्यामुळे व आघाडी धर्म पाळण्याची जबाबदारी असल्यामुळे आ.जयकुमार गोरे व रणजितसिंह ना.निंबाळकर यांना पुढील पाऊले उचलता आली नाहीत. मात्र, यंदाच्या निवडणूकीत सर्वच पक्षातील वातावरण अस्थिर असल्यामुळे रणजितसिंह ना.निंबाळकर यांना माढ्याच्या मैदानात उतरणे सोप्पे होणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)