ऑनलाइन शिक्षण उद्योग झपाट्याने वाढणार

नवी दिल्ली – आता मोठ्या शहराबरोबरच छोट्या शहरातील विद्यार्थीही ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा उपयोग मूल्यवर्धनासाठी करून घेत आहेत. त्याचबरोबर कौशल्य वाढीसाठी कंपन्या कर्मचाऱ्यासाठी ऑनलाइन शिक्षण पद्धत वापरत आहेत. त्यामुळे आगामी काळात ऑनलाइन शिक्षण उद्योग झपाट्याने वाढणार असल्याचे केपीएमजी या विश्‍लेषण करणाऱ्या संस्थेने म्हटले आहे.

या संस्थेने जारी केलेल्या माहितीनुसार 2016 मध्ये केवळ 16 लाख लोक ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा वापर करीत होते. मात्र, 2021 मध्ये हा आकडा वाढून 96 लाखांवर जाणार आहे. भारतात डिजिटायझेशन आणि इंटरनेटचा वापर वाढणार असल्यामुळे आगामी काळात शिक्षणाचे परंपरागत स्वरूप आमूलाग्र बदलणार असल्याचे या संस्थेने आपल्या अहवालात
म्हटले आहे.

याबाबत खासगी क्षेत्राने बराच पुढाकार घेतला आहे. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय संस्थांचीही मदत घेतली जात आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा वापर झपाट्याने होत असल्याचे दिसून येते.
याबाबत बोलताना अपग्रेड या संस्थेचे सहसंस्थापक मायंक कुमार यांनी सांगितले की, ऑनलाइन शिक्षण पद्धत झपाट्याने उत्क्रांत होत आहे. त्यामुळे शिक्षणसंस्था आणि कंपन्यांनीही या क्षेत्राकडे डोळेझाक करून चालणार नाही.

कंपन्यातील तंत्रज्ञान वेगात बदलत आहे. विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तंत्रज्ञान अतिशय वेगात बदलत आहे. त्यामुळे कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना हे नवे तंत्रज्ञान शिकवावे लागणार आहे. यासाठी परंपरागत क्‍लासरूम ऐवजी ऑनलाइन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. यासाठी आवश्‍यक माहिती कंपन्यांकडून उपलब्ध करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेषत: सर्वच मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्य वृद्धीसाठी या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करून घेत आहेत असे शाईन लर्निंग डॉट कॉम या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झेरस मास्टर यांनी या विषयावर बोलतांना सांगितले.

शैक्षणिक अभ्यासक्रमातही या पद्धतीचा वापर बऱ्याच शिक्षण संस्था करून घेत आहेत. त्यामुळे त्यांना जागतिक पातळीवरचे विविध क्षेत्रातील ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना देणे सोपे जात आहे असे केपीएमजी या संस्थेच्या वरिष्ठ
अधिकाऱ्यांनी सांगितले.

“2016 मध्ये ऑनलाइन शिक्षण यंत्रणेचा केवळ 16 लाख लोक उपयोग करीत होते. मात्र, दरम्यानच्या काळात संगणकांची संख्या आणि स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. या कारणाने 2021 पर्यंत ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा वापर करणाऱ्यांची संख्या 96 लाखांवर जाण्याची शक्‍यता आहे. विविध कंपन्या कर्मचाऱ्याच्या मूल्यवर्धित शिक्षणासाठी याचा वापर करीत आहेत.
-मायंक कुमार, सहसंस्थापक, अपग्रेड

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)