अबाऊट टर्न: ऑनलाइन-भिक्षा

हिमांशू

भिक्षा मागण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्याला मोठी परंपरा आहे. सीताहरण करण्यासाठी रावणसुद्धा भिक्षेकरी बनूनच आला होता. ज्योतिष सांगण्याच्या बहाण्याने काही “कलाकार’ कसे थेट घरात घुसतात आणि “हिरव्या साडीवाल्या बाईला तुझं सुख बघवत नाही,’ असे सांगून आपल्याकडून दक्षिणा कशी उकळतात, हेही अनेकांनी अनुभवले असेल. आता जग बदलले तसे भिक्षेकऱ्यांचेही प्रकार बदलले. त्यांच्याही डोक्‍यात नवनवीन संकल्पना घोळू लागल्या. निम्मे जग आजकाल “ऑनलाइन’ असते; त्यामुळे देवळाच्या पायऱ्यांवरचे भिकारी कुणाला दिसणारही नाहीत, हे आता त्यांना समजून चुकले असावे.

अशाच एका महिलेने दुबईमध्ये जी धमाल उडवून दिली, ती सध्या चर्चेत आहे. तिने भावनिक गोष्टीचा आधार घेऊन इतकी ऑनलाइन भिक्षा मिळवली की, इमोशनल गोष्ट लिहिणाऱ्या लेखकांनाही इतकी बिदागी मिळत नसेल. फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर तिने तिची दर्दभरी कहाणी शेअर केली. आपला घटस्फोट झाला आहे आणि मुलांच्या पालनपोषणाचा प्रश्‍न आपल्यासमोर आ वासून उभा आहे, अशी ही स्टोरी होती. सोबत तिने स्वतःचे काही फोटोही शेअर केले. सोबत मुलांचे काही फोटो होते. घरगुती हिंसाचाराची शिकार झाल्यामुळे आपल्यावर आणि मुलांवर ही वेळ आली, असे कथानक तिने रचले. हृदयस्पर्शी कहाणी ऐकून अनेकांचं मन द्रवलं. तिला आर्थिक मदत मिळू लागली.

तिची स्टोरी खरी आहे, असे जरी आपण गृहीत धरले तरी प्रश्‍न असा निर्माण होतो की, एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षण घेण्याची आवड आहे आणि त्याच्याजवळ पैसे नाहीत. अशा विद्यार्थ्याने मदतीचे आवाहन करणारी पोस्ट टाकली असती, तर त्याला किती प्रतिसाद मिळाला असता? जगात अशी अनेक मुले आहेत. हुशार आहेत; पण खरोखर गरीब आहेत. त्यांना ओळखीपाळखीचे लोकही मदत करीत नाहीत. परंतु एका परित्यक्तेची कहाणी ऐकून तिला मदत करण्यासाठी शेकडो हात पुढे आले. या महिलेने अवघ्या 17 दिवसांमध्ये 50 हजार डॉलर म्हणजे तब्बल 35 लाख रुपयांची ऑनलाइन जुळणी केली. परंतु तिच्या पटकथेत ट्विस्ट आला. मुले तिच्याजवळ राहतच नव्हती, तर तिच्या नवऱ्याजवळ होती. मुलांच्या फोटोचा गैरवापर होत असल्याचे तिच्या नवऱ्याला कुणीतरी सांगितले आणि नवरा थेट पोलिसांत गेला. बायकोच्या पोस्टमुळे मुलांची बदनामी होत असल्याची तक्रार त्याने दिली आणि अखेर महिला गजाआड गेली. पण म्हातारी मेल्याचे दुःख नसते… काळ सोकावतो!

या महिलेला पैसे गोळा करण्याची ही आयडिया “क्राउड फंडिंग’मधून मिळाली. अनेक कारणांसाठी सध्या “क्राउड फंडिंग’ची संकल्पना वापरली जाते. स्वतंत्र विचारांचे दिग्दर्शक ऑनलाइन पैसा गोळा करून विचारप्रधान चित्रपट काढतात. “क्राउड फंडिंग’मधून निवडणुका लढवल्या गेल्याचीही उदाहरणे आहेत. पण दुबईतल्या त्या महिलेमुळे आता ऑनलाइन फंडिंग मागणाऱ्या प्रत्येकाकडे संशयाने पाहिले जाईल. ऑनलाइन व्यवहारांमुळे पैशांची देवाणघेवाण जितकी सोपी झालीय, तितकीच फसवणूक सोपी झालीय. भावनेच्या भरात निर्णय घेणे धोक्‍याचेच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)