लाल कांद्याचा वांदा…

नांदूर खंदरमाळ (ता. संगमनेर) : येथील कांदा पिकावर तणनाशक फवारणी करताना शेतकरी.

संगमेनर तालुक्‍यातील नांदूर खंदरमाळ परिसरातील 1 हजार 800 एकरावरील पीक धोक्‍यात

संगमनेर – लाल कांद्याचे आगार म्हणून ओळखले जाणाऱ्या संगमनेर तालुक्‍याच्या पठार भागातील नांदूर खंदरमाळ व परिसरातील मोरवाडी, बावपठार, धुमाळवाडी परिसरातील सुमारे 1700 ते 1800 एकर क्षेत्रावरील खरीपाचे कांदापीक पावसामुळे धोक्‍यात सापडले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संगमनेर तालुक्‍याच्या या भागातील शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असलेला लाल कांदा या वर्षी मात्र त्यांची साथ देईल, असा विश्‍वास शेतकऱ्यांना वाटत नाही. केवळ साडेतीन महिन्यात हाताशी येणाऱ्या या पिकाला दिवाळीच्या सुमारास चांगला भाव मिळतो. शेतकऱ्यांच्या वार्षिक खर्चाची बेगमी त्यातून होते. साधारणपणे जून महिन्यात झालेल्या पहिल्या पावसानंतर जमिनीच्या मशागतीनंतर कांदा पेरला जातो. पेरणीनंतर 21 दिवसांनी तणनाशकाची फवारणी व रासायनिक खताची मात्रा पावसाच्या ओलीवर दिली जाते. या वर्षी पावसाने ओढ दिल्याने पिकाची वाढ खुंटली असली तरी अधूनमधून झालेल्या रिमझिम पावसाच्या सरींमुळे मोठ्या प्रमाणात गवत झाले आहे. अनेकांनी धाडस करून तणनाशक व खतांची मात्रा देण्यास सुरवात केली आहे.

पाऊस उशिरा झाल्यास दिवाळीच्या सुमारास हाताशी येणारा कांदा महिन्याभर उशिराने हाती येणार आहे. त्यामुळे पठार भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडणार आहे. त्यावेळी भाव कमी मिळाल्यास सावकारी कर्जाचा बोजाही डोक्‍यावर राहण्याची भीती व्यक्‍त होत आहे. कांदा पिकासाठी एकरी खर्च कांदा बियाणे-एकरी सहा ते सात हजार रुपये पायलीप्रमाणे, खुरपणी- सात हजार रुपये प्रती एकर, ट्रॅक्‍टरने मशागत- 800 रुपये प्रती तास, सरासरी एकरी खर्च- सुमारे 25 हजार रुपये असा येतो. त्यामुळे पाऊस न आल्यास एकरी 25 हजारावर पाणी फिरण्याची शक्‍यता आहे.

या वर्षी साडेतीन एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला पावसाचा टचका बसल्याने उतार कमी झाला. त्यामुळे एक महिना उशीर होणार असल्याने दिवाळी दूरच सावकारी कर्जाची चिंता भेडसावते आहे.
-मंगल छगन रोकडे,
महिला शेतकरी, नांदूर खंदरमाळ

पठारातील कांदा पीक सुमारे 90 टक्‍के पावसावर अवलंबून आहे. या वर्षी पावसाने दगा दिल्याने जमीन आवळली न गेल्याने कांद्याच्या पांढऱ्या मुळ्यांची पुरेशी वाढ झाली नाही. पाऊस नसतानाही काही शेतकऱ्यांनी धाडस करून तणनाशक फवारले आहे. साडेतीन महिन्यात हे पीक हाताशी येत असल्याने चांगला भाव मिळतो, यावर्षी ती शक्‍यता कमी आहे.
-गणेश सुपेकर, माजी सरपंच, नांदूर खंदरमाळ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)