एक पाऊल सकारात्मकतेचे

ऍड. सुचित्रा घोगरे-काटकर

संसार मोडून घटस्फोटासाठी कोर्टाची पायरी चढलेल्या लोकांचे विवाह संस्थेविषयीचे विचार खुपच नकारात्मक असल्याचे पाहायला मिळते. एका केसचा निकाल लागल्यावर तुमची केस संपली. आता तुम्ही दुसरे लग्न करू शकता असे सांगितले. तेंव्हा एका लग्नाने एवढा त्रास झाला. आता परत दुसरे करून कशाला पुन्हा त्रास करून घ्यायचा असे पक्षकाराने पटकन उत्तर दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विवाह ही सर्वांच्या जीवनातील महत्वपुर्ण घटना. आपलं प्रेमाचं माणूस जीवनाच्या प्रत्येक वाटचालीत आपल्या सोबत असणार ही जाणीव मनाला आनंद देते. पण विवाह टिकला नाही तर जीवन उध्वस्त होते. त्यामुळे घटस्फोट झालेले बहुतांशी लोक पुन्हा दुसरे लग्न करणे याकडे नकारात्मकतेने बघतात. पुन्हा त्याच त्या चक्रात कशाला अडकायचे यापेक्षा आपण एकटेच बरे हा विचार करतात.

पहिला संसार मोडल्यानंतर दुसरा संसार करण्यास नकार देताना पूर्वग्रहदुषित नजरेने पाहिले जाते. पण तो पूर्वग्रह दूर ठेवला तर दुसरा संसारही खुप चांगल्याप्रकारे आणि आनंदाने करता येतो हे मी जवळून बघितले आहे. चारचौघाप्रमाणे त्यानेही सहजीवनाची सुंदर स्वप्ने रंगवली होती. लग्न होऊन ती त्याच्या जीवनात आली. सर्व काही अपेक्षेप्रमाणे झाल्यामुळे तो खुपच खुश होता. पण पहिल्या पंधरा दिवसातच आपली खूप मोठी फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तिला व तिच्या घरच्यांना विश्‍वासात घेण्याचा प्रयत्न केला. पण बायकोने कायद्याचा आधार घेत त्याला व त्याच्या कुटुंबाला वेठीस धरले. सारी स्वप्ने धुळीला मिळाली.

एकीकडे करियर, नोकरीतील महत्वाचे दिवस. तर दुसरीकडे पोलिस, कोर्ट या चक्रात तो अडकलेला. विवाह, जीवनसाथी, संसार या गोष्टींवरील त्याचा विश्‍वास उडाला. आपली काही चूक नसताना हे आपल्या वाट्याला यावे या विचाराने तो खचून गेला. शेवटी कोर्टाचा निकाल लागून घटस्फोट मिळाला.

उमेदीची वर्षे या प्रकरणात गेल्याने त्याच्या वाट्याला निराशा आली. यातून तो पुन्हा कुठे बाहेर पडतोय तोपर्यंत त्याच्या दुसऱ्या लग्नाचा विषय निघाला. आधीच्या लग्नाचा असा अनुभव असल्याने त्याला पुन्हा या चक्रात अडकणार नाही असे सांगून त्याने दुसऱ्या लग्नास नकार दिला. पुन्हा तेच वाट्याला आले तर ? असे म्हणून तो नकारात्मक विचार करू लागला. परंतु जवळच्या लोकांनी त्याला समजावून सांगितले. कोणतेही पूर्वग्रह मनात न ठेवता तु दुसरे लग्न केले तर तुझा संसार व्यवस्थित होईल असा विश्‍वास दिला. लग्नाविषयी त्याच्या मनातील नकारात्मता जावून त्याने होकार दिला. तीन वर्षापूर्वी त्याचे दुसरे लग्न झाले.

आज त्यांना एक मुलगा असून दोघांचा छान संसार सुरू आहे एकदा एका मार्गावर अडथळा आला म्हणजे पुन्हा तो येईलच असा ग्रह न धरता सकारात्मकतेने पुढील पाऊल उचलले तर त्याच मार्गावरील दुसरा प्रवासही सुंदर होतो. त्याचा दुसरा संसार हे याचे उत्तम उदाहरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)