एक पाऊल सकारात्मकतेचे

– ऍड. सुचित्रा घोगरे-काटकर

पुलवामाच्या घटनेने अस्वस्थ झालेल्या मनाने संध्याकाळी सैनिक स्कूल शेजारी राहत असलेल्या मैत्रिणीच्या घरी पोहचले. अलकाचे आई-वडील टीव्हीवरील बातम्या बघत होते. तिचे वडिल सीताराम चव्हाण भारतीय नैदालातील निवृत्ती अधिकारी आहेत. त्यांचा मुलगा प्रशांत, जावई अमित हे भारतीय वायूसेनेमध्ये कमांडिंग ऑफिसर व मुलगी अर्चना विंग कमांडर आहे. प्रशांत पोखरण येथे तर अमित, अर्चना यांचे पोस्टिंग अंबाला येथे आहे. आमच्या गप्पा सुरु झाल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गप्पांचा विषय अर्थातच पुलवामा. पुलवामा, श्रीनगर, जम्मू, अवंतीपूर हा परिसर किती संवेदनशील आहे ना? असे मी म्हणाले. तोच काका म्हणाले अगं, अर्चना, अमितची बदली अवंतीपूर येथेच झाली असून ते मार्चमध्ये तेथे जात आहेत. अमित आधी पोहचतील. आणि मुलांच्या परीक्षा संपल्या की अर्चना तेथे रुजू होईल. त्या दिवशीच्या सर्व वर्तमानपत्रांची पहिली पाने पुलवामाच्या बातम्यांनी भरली होती. त्यावर सहज जरी नजर गेली तरी मनाची अस्वस्थता वाढत होती. टी.व्ही. वरील बातम्या पाहण्याची इच्छा होत नव्हती. आणि लेक आणि जावयाचे पोस्टिंग त्याच संवेदनशील भागात झाले आहे हे काका अगदी सहजतेने सांगत होते. आठ वर्षांचा अर्चित आणि तीन वर्षांची आमु या दोन चिमुकल्यांना घेऊन अर्चना अवंतीपूरला कर्तव्यावर हजर होणार आहे. मनात विचार आला. सध्यस्थितीत अर्चना, अमित यांच्या जागी कोणी सामान्य माणूस असता तर? काकांच्या जागी दुसरा वडिल असता तर? लगेच बदली रद्द कशी करता येईल यासाठी धडपड सुरु केली असती. नागरी सेवेतील नोकरदारांना सोयीच्या ठिकाणीच बदली हवी असते.

सरकारी वा खाजगी क्षेत्रातील नोकरी असो, अधिकारी वा शिपाई असो, कामाचे ठिकाण सर्व दृष्टीने सोयीचेच हवे हा आग्रह असतो. त्यासाठी वरिष्ठ अधिकारी मंत्री, राजकीय नेते यांच्या हाता-पाया पडतात. काहीजण वाट्टेल तेवढे पैसे मोजायला तयार असतात. नको असलेले ठिकाण मिळू नये किंवा हवे असलेले ठिकाण मिळावे म्हणून हे नोकरदार सतत धडपडत असतात. ग्रामीण भागात जायला कोणीच तयार नसते. दुर्गम भागात तर नाहीच नाही. शहरापासून पंधरा वीस किलोमीटरवर एखाद्या गावात बदली झाली तर लगेच अडचणींचा, गैरसोयींचा पाढा वाचला जातो. नको असलेल्या ठिकाणी बदली झाल्यावर नकारात्मक सूर आवळले जातात. स्वतःच्या गावापासून शेजारच्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या विभागात जायला हे नोकरदार नाखूष असतात. आणि चंद्रपूर गडचिरोलीसारख्या संवेदनशील ठिकाणी तर कोणालाही बदली नकोच असते.

याऊलट संरक्षण विभागातील लोक कधीही कोणत्याही ठिकाणी पोस्टिंग घ्यायला तयार असतात. मग ते कायम धगधगत राहणारे बर्फातील काश्‍मीर असो की रखरखते वाळवंट की अथांग समुद्रातील जहाज. कोणतेही पोस्टिंग हे लोक सहजतेने स्वीकारतात ते त्यांच्यातील देशप्रेम आणि सकारात्मक विचारांमुळेच. देशसेवेसाठी, संरक्षणासाठी प्राण हातात घेऊन कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही परिस्थतीत काम करण्यासाठी सदैव सज्ज असलेल्या या सैनिकांकडून नागरी सेवेतील नोकरदारांनी निदान एवढी तरी सकारात्मकता घ्यावी. जिथे कुठे बदली होईल तिथे जाण्यासाठी आनंदाने उचललेले पाऊल देशाला नक्कीच प्रगतीपथावर घेऊन जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)