एक पाऊल सकारात्मकतेचे

– ऍड. सुचित्रा घोगरे-काटकर

सार्वजनिक ठिकाणी नागरिकांमध्ये होणाऱ्या चर्चा समाजमनाचा आरसा असतात. या चर्चांमधून समाजाच्या विचार प्रवाहाचे प्रतिबिंब दिसते. सकाळी पुण्याला जाताना काही प्रवाश्‍यांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयेतेची चर्चा चालली होती. अधिकारी फुकटचे पगार आणि सुखसोयींचा लाभ घेतात. काम मात्र करत नाहीत असा चर्चेचा नकारात्मक सूर होता.अधिकाऱ्यांच्या या नकारात्मक प्रतिमेस काहींची वर्तणूक हे एक कारण आहे. दुसरे कारण म्हणजे चांगले काम करणाऱ्या मुठभर अधिकाऱ्यांच्या कामाचा अनुभव लोकांनी घेतलेला नसतो. त्यामुळे अल्प अनुभवातून किंवा इतरांच्या बोलण्यातून शासकीय अधिकारी काहीच काम करत नाहीत हा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन बहुतांशी लोकांच्या मनात निर्माण होतो.

“आहे रे’ आणि “नाही रे’ या लंबकाच्या मोठ्या दोलनात जनतेला नेहमी “नाही रे’ चाच अनुभव अधिकवेळा आलेला असतो. याविषयी विचार मनात चालू असताना संध्याकाळी कामानिमित्त मित्र गणेश हिंगमिरे यांच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे एक आजी व एक माजी शासकीय अधिकाऱ्यांची भेट झाली आणि त्यांच्या चर्चेत सहभागी होण्याची मला संधी मिळाली. भारतीय पोलीस सेवेत काम केलेले व सध्या पासपोर्ट विभागात महत्त्वाची भूमिका निभावत असलेले वरिष्ठ आय.पी.एस. अधिकारी श्री. अनंत ताकवले हे सुरु करत असलेल्या रस्त्यावरील भटक्‍या मुलांचे शिक्षण व पुनर्वसन प्रकल्पाविषयी भरभरून बोलत होते.

सातारा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी पदावर काम केलेले व आयुक्त म्हणून निवृत्त झालेले श्‍याम देशपांडे यांच्याबरोबर ते या प्रकल्पात कार्यरत आहेत. दुसरे श्री. गोविंद हांडे हे शासनाच्या फलोत्पादन विभागातून दहा वर्षांपूर्वी निवृत्त झाले असून अजूनही गणेश हिंगमिरे यांच्याबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उत्पादनांची निर्यात कशी वाढेल याविषयावर सातत्याने काम करत आहेत. गेल्याच आठवड्यात तुषार भद्रे यांनी बालगृहीतील मुलांना शाहू कलामंदिर येथे नाटक पाहण्यासाठी आमंत्रण दिले. मुलांना येण्याजाण्याच्या समस्येविषयी बाल कल्याण समितीचे सदस्य योगेंद्र सातपुते यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नारायण सारंगकर यांना ही अडचण सांगितली आणि सरांगकर साहेबांनी क्षणात गाडीची व्यवस्था उपलब्ध करून दिली.

काही दिवसांपूर्वी एका खटल्यात समोर आलेल्या मुलाला शिकायचे होते. पण पालक काहीच सहकार्य करत नव्हते. हे पाहून त्याची फी भरण्यासाठी स्वतःच्या पर्स मधील पैसे काढून देण्यापासून ते त्याच्या शिक्षणातील अडचणी सोडविण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करणाऱ्या न्यायाधीशास अवनी गोडसे यांना मी स्वतः जवळून पाहत आहे, अनुभवत आहे. हे सारं अनुभवताना मनात विचार आला.

काय गरज आहे या पोलीस, न्यायाधीश यांना स्वतःच्या कामाव्यतिरिक्त समाजासाठी हे काम करण्याची? काय गरज आहे देशपांडे, हांडे यांना निवृत्तीनंतरही समाजहिताच्या उपक्रमांमध्ये कार्यरत राहण्याची? याचे उत्तर एकच – समाजाप्रती संवेदनशील असलेले त्यांचे मन आणि अत्यंत तळमळीने, निस्वार्थ सेवाभावनेने काम करण्याची प्रवृत्ती. यातील प्रत्येकावर सविस्तर लिहावे एवढे मोठे काम हे अधिकारी करत आहेत. कोणीही आमच्याविषयी लिहा असे सांगितले नाही. सगळेच प्रसिद्धीपेक्षा कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य देतात. इथे माझे अनुभव मांडलेत. हे एक सकारात्मकतेचे पाऊल आहे ते साऱ्याचा शासकीय अधिकाऱ्यांना एकाच तराजूच्या पारड्यात जोखण्याचा नकारात्मक दृष्टीकोन दूर व्हावा यासाठी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)