विद्यावेतनासाठी पुणे विद्यापीठाचे एक पाऊल मागे

सर्व मागण्या मान्य झाल्याने विद्यार्थ्यांचे उपोषणही मागे

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पूणवेळ पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे सरसकट विद्यावेतन देण्यास विद्यापीठ प्रशासनाने तत्त्वत: मान्य केले आहे. तसेच एम.फिल. विद्यार्थ्यांनाही विद्यावेतन देण्याबाबत विद्यापीठ सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने प्रमुख मागण्या मान्य केल्याने गेल्या 5 दिवसांपासून अन्नत्याग करीत बसलेल्या विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यापीठातील एम.फिल. व पीएच.डी. संशोधकांना पूर्वीप्रमाणेच विद्यावेतन मिळावे, या मागणीसाठी 5 विद्यार्थी गेल्या 5 दिवसांपासून मुख्य इमारतीच्या समोर उपोषणास बसले होते. विद्यापीठाने पीएच.डी. व एम.फिल.च्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे विद्यावेतन देण्याचा निर्णय घेतला. त्याला विरोध दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांनी उपोषणाचे हत्यार उगारले आहे. शनिवारी विद्यावेतनाचा प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न विद्यापीठाकडून करण्यात आला. त्यानंतरही उपोषण मागे घेण्याबाबत विद्यार्थी तयार नव्हते.

यासंदर्भात कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाच्या संदर्भात शनिवारी बैठक झाली. त्यानुसार विशेष बाब म्हणून विद्यापीठात पूर्णवेळ पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना तात्पुरत्या प्रवेशाच्या दिनाकांपासून सरसकट विद्यावेतन देण्याचे मान्य करण्यात आले. तसेच एम.फिल. विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन देण्यासाठी सकारात्मक प्रस्ताव पुढील व्यवस्थापन परिषदेत ठेवण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

उपोषणकर्ता प्रवीण जाधव म्हणाला, विद्यापीठाने संशोधक विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच एम.फिल. विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यास अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शनिवारी दीपाली खर्डे, स्नेहल साबळे आणि मयुर चव्हाण या विद्यार्थ्यांची उपोषणामुळे प्रकृती ढासळली होती. त्यांना तातडीने विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

विद्यावेतनासाठी विद्यापीठात विद्यार्थ्यांना संशोधन सोडून आंदोलन व उपोषण करावे लागत आहे, ही बाब दुर्देवी आहे. या विद्यार्थ्यांची युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी भेट घेतली. यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, राज्य युवक कॉंग्रेस प्रभारी प्रतिभा रघुवंशी, सहप्रभारी मनीष चौधरी, उमेश पवार, सतीश पवार, मोहिनी जाधव आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, यासंदर्भात शिष्टमंडळानी प्र-कुलगुरू एन. एस. उमरानी यांची भेट घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)