शिर्डी – भाऊबंदकीच्या कारणातून श्रीगोंद्यातून शिर्डीत दहाव्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या एका तरुणाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे शिर्डीत एकच खळबळ उडाली असली, तरी या घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून कोणताच दुजोरा मिळालेला नाही. One shot dead in Shirdi and killed
शिर्डीतील लक्ष्मीनगर भागात श्रीगोंद्यातील एक तरुण त्याच्या नातेवाईकांकडे दहाव्याच्या कार्यक्रमासाठी आला होता. तसेच इतर ही नातेवाईक या कार्यक्रमासाठी आलेले होते. यातील काही नातेवाईकांनी शिर्डीतील शिवाजीनगर भागात एका हॉटेलमध्ये खोली घेतलेली होती. मंगळवारी सायंकाळी 6 वाजेदरम्यान हा तरुण त्या नातेवाईकांकडे गेला होता. यावेळी हॉटेलच्या खोली क्र.104 मधून गोळीबार झाल्याचा आवाज आला.
हॉटेल व्यवस्थापनाने त्या खोलीकडे धाव घेतली. त्या ठिकाणी श्रीगोंद्यातील प्रतीक संतोष वाडेकर (वय-20 वर्षे) यांच्या छातीवर गोळी लागली असल्याचे त्यांना दिसले. या प्रकरणी घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.