नगर – मित्रासोबत गंगा उद्यानाजवळून जाणाऱ्या चार जणांच्या टोळक्याने युवकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चाकूने कापून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी मंगळवारी (दि.14) रात्री सव्वासात वाजता तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाणीत निखिल राजेंद्र सोनवणे (रा. चव्हाणवाडी, ता. गेवराई, जि. बीड) हे जखमी झाले आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, सोनवणे हे त्यांच्या मित्रासमवेत मिस्कीन मळा येथील गंगा उद्यान जवळ रस्त्याने पायी चालले होते. त्यावेळी स्कूटीवरून दोन अनोळखी इसम आले. त्यानंतर आणखी दोन जण तिथे आले. या चौघांनी काही कारण नसताना सोनवणे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चाकूने कापून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात निखिल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक वाकचौरे हे करीत आहेत.