नागपूर महामेट्रोच्या वरिष्ठ उपमहाव्यवस्थापकासह एकास अटक

डेटा लीक प्रकरण : आयटी ऍक्‍टअंतर्गत पोलिसांची कारवाई

नागपूर – डेटा लीक केल्याच्या प्रकरणी नागपूर महामेट्रोच्या वरिष्ठ उपमहाव्यवस्थापकासह एका ऑपरेटरला अटक करण्यात आली आहे. महामेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक विश्वरंजन बेवरा आणि ऑपरेटर प्रवीण समर्थला मेट्रोच्या संबंधातील महत्वाचा डेटा लीक केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. दोघांना आयटी ऍक्‍ट प्रमाणे अटक होऊन जामीन देखील मिळाला असल्याचे समजते.

या दोघांविरोधात महामेट्रो प्रशासनने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. महामेट्रोकडून आरोप करण्यात आला आहे की बेवरा यांनी ऑपरेटर समर्थच्या मदतीने महत्वाचा डेटा लीक केला आहे. हा डेटा महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या दैनंदिन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग संदर्भातील आहे. ब्रिजेश दीक्षित रोज कनिष्ठ अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामासंदर्भात दिशा निर्देश देतात. मात्र, बेवरा यांच्या सांगण्यावरून समर्थ याने तो ऑडीओ डेटा रेकॉर्ड करत बेवरा यांना सोपविला होता.

आता बेवरा यांनी तो ऑडिओ डेटा बाहेर कोणाला दिला आहे का याची चौकशी पोलीस करत आहे. विशेष म्हणजे विश्वरंजन बेवरा यांची काही आठवड्यापूर्वी कामात कसूर केल्याप्रकरणी विभागीय चौकशी देखील सुरू केली गेली होती. यामुळे बेवरा नाराज होते आणि त्याचमुळे त्यांनी आपल्याच संस्थेमध्ये वरिष्ठांची अशी हेरगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

अत्यंत तीव्र गतीने निर्माण कार्य करत नागपूरकरांच्या कौतुकास पात्र ठरलेली महामेट्रो हेरगिरीच्या एका अंतर्गत प्रकरणामुळे हादरली आहे. महामेट्रोच्या सिग्नल एन्ड टेलिकॉम विभागाचे सिनियर डेप्युटी जनरल मॅनेजर विश्वरंजन बेवरा यांच्यावर महामेट्रोने आरोप लावला आहे की त्यांनी प्रवीण समर्थ यांच्या मदतीने महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांदरम्यान होणारे संभाषण रेकॉर्ड केले आणि ती माहिती बाहेर पाठविली. या गंभीर प्रकरणाची चुणुक लागल्यानंतर मेट्रो प्रशासनाने सुरुवातीला स्वतःच चौकशी केली होती. त्यात तथ्य आढळ्यानंतर त्याची रीतसर तक्रार नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी ही प्राथमिक तपास केल्यानंतर विश्वरंजन बेवरा आणि प्रवीण समर्थ याला दोघांना आयटी ऍक्‍ट अन्वये अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)